Breaking News

अंबादास दानवे यांचा हल्लाबोल, मदत केली मग शेतकरी आत्महत्या का करतोय सरकारचं कृषीधोरण शेतकरी विरोधी

दुष्काळ, अवकाळी पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या , शेतमालाला बाजारभाव पीक विमा आदी समस्येमुळे शेतकरी त्रस्त आहे. सरकार मोठं मोठ्या घोषणा करत, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काही पडत नाही. केंद्र व राज्य सरकारचं धोरण हे बळीराजाचा बोट मोडणार आहे. सरकारचे शेतकऱ्यांप्रती पुतना मावशी प्रेम असून सरकारच कृषीविषयक धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरून सरकारवर विधान परिषदेत आज हल्लाबोल चढविला.

शेतकऱ्यांच्या पाचवीला सतत दारिद्रय पुजले आहे. सरकार मोठं मोठ्या घोषणा करत आहे. सरकार म्हणतंय शेतकऱ्यांना मदत केली मग शेतकरी आत्महत्या का करतोय असा सवाल अंबादास दानवे यांनी २६० अनव्ये प्रस्तावावर बोलताना उपस्थित केला.

अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, हे सरकार आल्यापासून दररोज ८ ते ९ शेतकरी आत्महत्या करतात. ८९०० शेतकऱ्यांनी हे सरकार आल्यापासून आत्महत्या केल्या आहेत. मुख्यमंत्री यांनी नांदेड येथे आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याची केलेली घोषणा हवेतच विरल्याचा टोलाही यावेळी लगावला.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, शेतकऱ्यांचे १० हजार २२ कोटी ६४ लाख रुपये शेतपिकांच्या नुकसानीचे तर ५ हजार ९७५ कोटी रुपयांचे कर्ज मुक्त करण्याचे असे एकूण १५ लाख ९९७ कोटी ६४ लाख रुपये सरकारकडे शेतकऱ्यांची थकबाकी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून ५ लाख २८ हजार शेतकरी वंचित आहेत. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा ४ था हप्ता रुपये १ हजार ८४५ कोटी १७ लाख रुपये, केंद्र शासनाच्या १७ व्या हप्त्या सोबत देणे आवश्यक होते मात्र राज्य शासनाने मुद्दाम हा हप्ता रोखून धरल्याचाआरोप केला.

अंबादास दानवे म्हणाले की, २०२३ मध्ये राज्यातील १५ जिल्ह्यात २४ तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ तर १६ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला. शासनाने दुष्काळग्रस्त १०२१ महसूल मंडळांमध्ये सवलती जाहीर करूनही अद्याप शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ पर्यंतची ४१०५कोटी ७५ लाख रुपयांची नुकसान भरपाईची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या सरकारकडे असलेल्या विविध थकबाकीकडेही सभागृहाचे लक्ष वेधले.

शेतकऱ्यांचा कांदा निर्यात धोरण हे दुटप्पी असून गुजरात, मध्यप्रदेश मधून बोगस बी बियाणे, खत हे शेतकऱ्यांच जीवन संपवण्याचं काम करत असा आरोपही यावेळी अंबादास दानवे यांनी केला.

राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना जुमानत नाही

संभाजी नगरमधील पिंपळखुटा येथील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्यांने बँक मॅनेजरने सीबील स्कोअर कमी असल्याचे खोटे कारण देत १ लाख रुपयांची मागणी केल्याने आत्महत्या केली. त्यामुळे बँक मॅनेजरवर कारवाईची मागणी अंबादास दानवे यांनी सभागृहात केली.
मागेल त्याला शेततळे ही योजना कागदावर असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. जायकवाडी भूपमापक केंद्र बंद असल्याचेही यावेळी सांगितले.

कृषी खात्यात गोण्या खरेदीत प्रचंड प्रमाणात अनागोंदी

कृषी खात्यात गोण्या खरेदीत प्रचंड प्रमाणात अनागोंदी झाली आहे. ४०० रुपयांची गोणी १२५० रुपयाला विकण्यात आली असून ६ लाख १२ हजार गोण्या खरेदी करण्याचे आदेश यंत्रमाग महामंडळ ला देण्यात आले आहेत. ५२.५३ कोटी रुपयांचे शासनाचे नुकसान झाले असून याप्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *