अतुल लोंढे यांचा सवाल,… गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही? देवेंद्र फडणविसांच्या सत्ताकाळात महाराष्ट्र, राज्यातील जनता व कायद्याचे रक्षकही असुरक्षित

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. २०१४ पासून गृहमंत्रालय सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याला लाभलेले सर्वात निष्क्रीय व बेजबाबदार गृहमंत्री आहेत. पुण्यात दोन तरुणांना कारखाली चिरडून मारले जाते, जळगावातही तसाच प्रकार घडतो आणि आता कायद्याचे रक्षक असलेले तहसिलदार यांच्यावर भरदिवसा हल्ला होतो, गृहविभाग काय करतो, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर हल्लाबोल करताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, इंदापूरच्या तहसिलदारांवर भरदिवसा समाजकंटकांनी हल्ला केला, असे प्रकार सातत्याने होत आहेत. राज्याचा गृहमंत्री जर कणखर असेल तर गुन्हेगारांना चाप बसतो, पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गुन्हेगारांवर वचक बसण्याऐवजी त्यांचे मनोधैर्य वाढल्याचे दिसते. महाराष्ट्र व राज्यातील जनता फडणवीसांच्या काळात सुरक्षित राहिलेली नाही पण फडणवीस हे फारसे गांभिर्याने घेत नाहीत. “गाडी खाली कुत्रा जरी आली तरी विरोधक राजीनामा मागतात”, असे बेजबाबदार विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. माणसे किड्या मुंग्यासारखी मारली जातात, गाडीखाली चिरडली जातात तरीही गृहमंत्र्यांला त्याचे काहीच वाटत नसेल तर अशा व्यक्तींनी खर्चीवर बसावेच का? फडणवीसांना गृहमंत्रीपद झेपत नाही हे त्यांच्या काळातील घटना पाहून स्पष्ट दिसते पण ते वस्तुस्थिती स्विकारत नाहीत. कायदा सुव्यवस्थेबद्दल गहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न विचारणार, का त्यालाही पंडित जवाहरलाल नेहरुच जबाबदार आहेत, नेहरुच फडणवीसांना काम करु देत नाहीत का? असा खोचक टोलाही यावेळी लगावला.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *