राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी अटक केलेला मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि अन्य चौघांना न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
उत्तर प्रदेश विशेष टास्क फोर्स आणि मुंबई क्राइम ब्रँचने रविवारी कथित शूटर शिवकुमारसह (२०) इतर चार आरोपी, अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रताप सिंग यांना आणि इतर चार जणांना उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील नानपारा येथून अटक केली होती. चारही जणांनी शिवकुमारला आश्रय देऊन नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने आरोपींना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद पाटील यांच्यासमोर हजर केले.
या प्रकरणातील आर्थिक बाबी तसेच हत्येसाठी गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे कशी खरेदी केली त्याबाबतचा तपास करणे आवश्यक आहे, त्यासाठी त्यांच्या कोठडीची आवश्यक असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले . दुसरीकडे, आरोपी अनुराग कश्यपने शिवकुमारला दोन लाख रुपये दिले होते, त्या पैशाचा स्रोत तपासण्याची गरज असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. शिवकुमार हा वॉन्टेड आरोपी शुभम लोणकरच्या संपर्कात होता त्यामुळे लोणकर कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी त्याच्या कोठडी आवश्यक आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पाचही आरोपींना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
माजी मंत्री बाबा सिद्दीक (६६) यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या छातीवर दोन गोळ्या लागल्या. त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात नेण्यात आले,. परंतु, तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
Marathi e-Batmya