वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केल्याचा दावा विनोद तावडे यांच्या निवेदनात करण्यात आला.
पुढे विनोद तावडे आपल्या निवेदनात म्हणाले की, हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली. हितेंद्र ठाकूर व क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो असा खुलासाही यावेळी केला.
शेवटी विनोद तावडे निवेदनात म्हणाले की, त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. राहुल गांधी व सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी अशी मागणीही केली.
Marathi e-Batmya