Breaking News

निवडणूकांच्या तोंडावर भाजपाच्या मंत्र्यांकडून “संविधान मंदिर” कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर विविध वर्गातील मतदारांना खुष करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध घोषणा करण्यात येत आहे. त्यातच आता भाजपाच्या एका मंत्र्यांनी तरूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेषतः दलित मतदारांना खुष करण्यासाठी आयटीआयच्या प्रत्येक कॉलेजमध्ये संविधान मंदिर उभारण्याची योजना जाहिर केली आहे.

महाराष्ट्रातील सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व १६३ शासकीय तांत्रिक विद्यालयात संविधान मंदिर उभारले जाणार आहे. या संविधान मंदिरांचे १५ ऑगस्ट २०२४ रोजी एकत्रित ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, संचालक सतीश सुर्यवंशी, सह संचालक डॉ. अनिल जाधव, केदार दहीबावकर आदी उपस्थित होते.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे आम्ही संविधान मंदिर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना राज्यघटनेची महती, त्याचे महत्व समजावण्याचा उद्देश आहे. हे मंदिर विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल. त्यांना, त्यांच्या विचारांना आकार देईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण या ठिकाणी पूजली जाईल. योग्य विचारांनी प्रेरित झालेला कौशल्य संपन्न युवा स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि देशाची प्रगती साधण्याचे सामर्थ्य बाळगतो. त्यामुळे नीतिमंत विचार आणि हाताला रोजगार असणारी पिढी घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे सांगितले.

२६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी, यासाठी संविधान मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतला होता. औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या परिसरात निर्माण होणारी पवित्र वास्तू इतक्या पुरतेच या संविधान मंदिराचे अस्तित्व सीमित राहणार नाही. महिन्यातून एकदा येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. भारतीय राज्य घटनेतील तरतुदीबाबत विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. नागरिकांमध्ये विशेषतः उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांबद्दल जागरूकता वाढण्यासाठी मोहीम आयोजित करणे, घटनात्मक समस्या, दुरुस्त्या, समकालीन समाजातील घटनेची भूमिका यासारख्या विषयांना घेऊन परिसंवाद, चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा आयोजित करणे, विद्यार्थ्यांना त्यांचे घटनात्मक अधिकार समजून घेण्यास किंवा त्यांचा वापर करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना कायदेशीर सहाय्य आणि समर्थन प्रदान करणे, राज्यघटनेचे सखोल आकलन व्हावे यासाठी निबंध स्पर्धा व संबंधित कार्यक्रम आयोजित करणे यासह संविधानाच्या विविध पैलूंवर पुस्तके, लेख इत्यादी गोष्टी उपलब्ध करुन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्याचा उद्देश आहे. संविधान दिवस, प्रजासत्ताक दिन यासारख्या विशेष महत्त्व असलेल्या दिवसांचे औचित्य साधून या दिवशी येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.

मंत्री लोढा यांनी संविधान मंदिर आणि आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांबाबत नागरिकांच्या सूचना देखील मागवल्या आहेत. नागरिक त्यांच्या सूचना [email protected] या ई-मेलवर पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राज्यात भाजपाचा पराभव झाला असून या पराभवाच्या कारणीमिंमासेत दलित आणि मुस्लिम समाजाच्या मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पुन्हा एकदा दलित समाजाची मते भाजपाने आपल्या बाजूने वळविण्यासाठी संविधान मंदिराची नवी योजना आणली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

त्यातच काही दिवसांपूर्वी सत्ताधारी महायुतीतील एका मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने राज्याच्या निवडणूक मुख्याधिकारी यांची भेट घेत दलित आणि मुस्लिम बहुल विभागात जास्तीचे मतदान बुथ उभारू नका अशी मागणी करत वाद घातल्याची चर्चा राज्याच्या मंत्रालयात रंगलेली असताना आता भाजपाच्या मंत्र्यानेच संविधान मंदिराची योजना जाहिर केल्याचे बोलले जात आहे.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *