तुमची ईडी असो वा काही तिला ‘येडी’ केल्याशिवाय गप्प बसणार नाही चितपट कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांची फळी तयार केलीय- शरद पवारांचा टोला

पंढरपूरः प्रतिनिधी

ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्याविरोधी कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो. आजचे राज्यकर्ते गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांच्या विरोधात जो बोलतो त्यावर ईडीचं हत्यार वापरतात. आता तुमची ईडी असो वा काही तिला ‘येडी’ केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशाराही शरद पवार यांनी भाजपा सरकारला दिला.
राज्यात ठिकठिकाणी चितपट कुस्ती खेळणार्‍या पैलवानांची फळी तयार केली आहे. त्यामुळे येत्या २१ तारखेच्या मतदानानंतर २४ तारखेला कळेल की यावेळी लोकांचा मुड काही वेगळाच होता या स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाच्या सत्ता स्थापनेच्या दाव्यावर टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.
राज्याचे मुख्यमंत्री जिथे जातात तिथे सांगतात या निवडणुकीत काही दमच नाही… आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत परंतु आम्हाला कोण पैलवानच दिसत नाही. त्याचं उत्तर आम्ही ‘कुणाशीही कुस्ती खेळत नसतो’ असं दिलं होतं…तुम्ही कुठला तरी धरुन आणलेला पैलवान समोर आणता आहात मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे… जिल्ह्या-जिल्ह्यात तालुक्या तालुक्यात पैलवान तयार करण्याचे काम न बोलता गेले अनेक वर्षे करतोय असे ते म्हणाले.
मी पंढरपुरात अनेक वेळा आलोय. परंतु आजचं चित्र काही वेगळंच आहे… तुमचं ठरलं वाटतं असं सभेला जमलेल्या समुदायाने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव जोरजोरात ओरडत सांगितले.
मी महाराष्ट्राचा दौरा करतोय… जाहीर सभा घेतोय…. आज सर्वात पुढे तरुण पिढी दिसत आहे… नाहीतर काही ठिकाणी बाप एकीकडे आणि पोरगा दुसरीकडे… त्यामुळे आता बापानेच ठरवलं पोरगं म्हणतंय तेच खरं… त्यामुळे या दोघांची शक्ती संपुर्ण महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या पाठीशी उभी राहिलेली दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोलापूरात अमित शहा येवून गेले. ते गृहखात्याबद्दल काही सांगतील असं वाटलं होतं परंतु त्यांनी भाषणाची सुरुवात ‘पवारसाबने महाराष्ट्र के लिए क्या किया’… यांनी दिवे लावले आणि आम्हाला विचारतात आम्ही काय केले अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्रात शेतीउदयोग उभे केले… महाराष्ट्रात शैक्षणिक संस्था उभ्या करण्याचे काम केले… समाजातील सर्व घटकांना सवलती देण्याचा प्रयत्न केला… राज्य चालवत असताना सर्वांच्या हिताची जपणूक केली… मग त्यामध्ये स्त्रियांना ५० टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न केला…देशात पहिल्यांदा महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.
तुमचं दिल्लीत राज्य आहे. महाराष्ट्रातही तुमचं राज्य आहे. परंतु यावेळच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काय करायचं हे आम्ही दाखवतोच असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *