मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणूकीकरीता ऑक्टोंबर महिन्यात सुरु झालेला प्रचार आज संध्याकाळी ६ वाजता संपला. मागील २० ते २५ दिवस भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेने चांगलाच राजकिय धुराळा उडवून दिला. मात्र खऱ्या लढतीचे चित्र भाजपा विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस असेच प्रचारात दिसून आले.
भाजपाकडून प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी राज्याच्या विविध भागात सभा घेतल्या. मात्र भाजपाचा प्रचारा दरम्यान भर हा देशभक्ती, ३७० कलम, दुष्काळमुक्ती आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या गतीकालावर टीका करण्यावरच राहीला.
तर दुसऱ्याबाजूला काँग्रेसकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी यांच्या सभा झाल्या. मात्र या दोन्ही नेत्यांकडून देशातील आर्थिक मंदी आणि राज्यातील बेरोजगारीवर भाष्य केले. परंतु काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी जाहीर सभा घेण्याऐवजी पत्रकार परिषदा घेण्यावर भर दिला. त्यामुळे राज्यातील प्रचाराचा काँग्रेसचा प्रभाव कुठे दिसून आला नाही.
या उलट राष्ट्रवादी काँग्रेसकडून जवळपास राज्यातील सर्वच भागात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मोठी आघाडी घेतली. त्यांच्या प्रत्येक प्रचारसभांमधील वक्तव्यांची चर्चा प्रसारमाध्यमांबरोबरच सोशल मिडीयावरही मोठ्या प्रमाणावर झाली. त्याचबरोबर मागील पाच वर्षात भाजपा-शिवसेनेने केलेल्या विकास कामांचा हिशोब मागण्यांवर त्यांचा भर राहीला. तसेच पक्षातून पळवून नेलेल्या नेत्यांचीही त्यांनी चांगलीच हजेरी घेतली.
राज्यातील प्रत्येक निवडणूकीत शिवसेनेचा असा स्वतंत्र ठसा असायचा मात्र यंदा पहिल्यांदाच शिवसेनेने भाजपानंतरची दुय्यम भूमिका स्विकारल्याने त्यांच्या प्रचार सभांची म्हणावी तशी चर्चा झाली नाही. अपवाद फक्त कणकवली-सिंधुदूर्गातील सभेचा आहे. आदीत्य ठाकरे यांच्यानिमित्ताने ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याने त्यांच्याबाबत फारच उस्तुकता निर्माण झाली होती. मात्र त्यांच्या १६ कोटीच्या मालमत्तेची आणि प्रचारातील गुजराती भाषेतील आवाहन, तामीळ पध्दतीची वेशभूषा याचीच चर्चा झाली.
मनसेच्या राज फॅक्टरची जनतेला मोठी अपेक्षा होती. परंतु त्यांनी राज्यातील ज्वलंत प्रश्न, आर्थिक मंदी, शहरांचे बकालीकरण आदींवर जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
वंचित आघाडीने मात्र लोकसभेप्रमाणे चांगलाच प्रचारात जोर पकडला. वंचित, गोरगरीब समाजाच्या विशेषतः ३ आणि ४ श्रेणीत काम करणाऱ्या कामगार वर्गाचे प्रश्न, जातीय प्रश्नांना त्यांनी चांगलेच महत्व दिल्याचे त्यांच्या प्रचारातून जाणवत राहीले. वंचित आघाडीकडून प्रसारमाध्यमाऐवजी सोशल मिडीयाच्या माध्यमातून चांगलाच प्रचार केल्याचे दिसून येत आहे.
या राजकिय प्रचारांचा जनतेच्या मनावर किती परिणाम झाला याचे गुपित २४ तारखेला उघडले जाणार आहे. तत्पूर्वी या सर्व मुद्यांच्या अनुषंगाने जनता मतदानासाठी किती बाहेर पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तुर्तास सर्वच राजकिय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा पुढील निवडणूकीपर्यंत थंडावल्या.
Marathi e-Batmya