भाजपा म्हणते, उध्दव ठाकरे हे आंबेडकरच काय ओवैसींशीही युती करू शकतात पण जिंकेल भाजपा युतीच-प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरच काय ओवैसी यांच्याशीसुद्धा युती करू शकतात, पण आमच्या विरोधात कोणी कितीही युती केली, तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही एक्कावन्न टक्के मतांची लढाई लढून कोणत्याही निवडणुकीस कधीही सज्ज आहोत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे केले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी राजधानीत गेले असता पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीबाबत पत्रकारांनी विचारले असता बावनकुळे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी कोणाशीही युती केली तरीही आम्ही निवडणूक जिंकण्यास सज्ज आहोत. महाविकास आघाडीच्या रुपाने आमचे विरोधक यापूर्वीच एकत्र आहेत. तरीही आम्ही राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका जिंकल्या आहेत. कोणतेही पक्ष आमच्या विरोधात एकत्र आले तरी फरक पडत नाही. शिंदे फडणवीस सरकार चांगले काम करत आहे. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष संघटना मजबूत करत आहेत. आम्ही ५१ टक्के मते मिळविण्याची तयारी करत आहोत. त्यामुळे विरोधकांच्या युतीमुळे आम्हाला फरक पडणार नाही.

मागासवर्गीयांची किंवा आदिवासींच्या मतांवर कोणाची मालकी नाही. कोण काम करते हे पाहून लोक मतदान करतात. लोक शिंदे फडणवीस सरकारच्या पाठीशी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार काम करून संविधानाचे रक्षण करत आहेत, हे लोक पाहतात. मोदीजी आपले हित जोपासतात हे ते जाणतात. नंदूरबार जिल्ह्यात ७५,००० आदिवासींनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त करण्यासाठी धन्यवाद मोदीजी अशी पत्रे लिहिली, हे ध्यानात घेतले पाहिजे असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. न्यायालयाच्या निकालाची सर्वांनी वाट पहावी. न्यायालयाचा अवमान होईल, असे वर्तन कोणी करू नये. कोणीही आक्रमक भूमिका घेऊ नये तर संयमाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

About whizzygeeks

Check Also

राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर २२६ तपासण्या पूर्ण; ५१ संस्था बंद, पुणे विषारी दारू प्रकरणानंतर कारवाई

पुण्यातील विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *