दत्तात्रय भरणे यांची माहिती, कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना १५ दिवसांत नुकसान भरपाई राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद अंतर्गत २०९ कोटींचे वाटप करणार

कोकण विभागातील अवकाळी पाऊस व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत सुमारे २०९ कोटी रुपयांची, त्याचप्रमाणे हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गतची मदत १५ दिवसांच्या आत वितरित करण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य निलेश राणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांच्या नुकसानीची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले.

पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, एनडीआरएफच्या निकषांनुसार हेक्टरी सुमारे २२ हजार ५०० रुपये मदत देण्यात येणार असून कोकण विभागातील बाधित शेतकऱ्यांसाठी २०९ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव सादर केला आहे. ही मदत लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे. जिल्हानिहाय मदतीचा तपशील देताना ठाणे जिल्ह्यातील ४ हजार ६६९ शेतकऱ्यांना ४ कोटी ८४ लाख रुपये, पालघर जिल्ह्यातील १७ हजार ७१२ शेतकऱ्यांना ६ कोटी ८३ लाख रुपये, रायगड जिल्ह्यातील सुमारे १७ हजार शेतकऱ्यांना २० कोटी २८ लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील ५२ हजार ६२८ शेतकऱ्यांसाठी ९८ कोटी ४५ लाख रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२ हजार ३२२ शेतकऱ्यांसाठी ७९ कोटी ५ लाख रुपयांची मदत प्रस्तावित करण्यात आल्याचेही सांगितले.

शेवटी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, याशिवाय हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गत आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे २१७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. एनडीआरएफमधील मदत तसेच पीक विमा योजनेंतर्गत मंजूर नुकसानभरपाई या दोन्ही रकमा १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी शासन आवश्यक कार्यवाही करीत असल्याचे स्पष्ट केले.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य शेखर निकम यांनी सहभाग घेतला.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांची माहिती, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *