राज्यातील महायुती सरकारने सुरु केलेल्या माझी लाडकी बहिण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून सातत्याने आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लाडकी बहिण योजनेतील रकमेत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वाढ करणार असल्याचे जाहीर केले. तर दुसऱ्याबाजूला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डिसेंबर अखेरपर्यंत बहिणींना हप्ता मिळेल मात्र जानेवारी-फेब्रुवारी पासून हप्ता मिळणे अवघड होईल असे सांगत लाडकी बहिण योजनेमुळे राज्यातील तिजोरी रिकामी झाल्याचे सांगत राज्य सरकारवर टीकाही केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीका करत इशारा दिला की, जर माझी लाडकी बहिण योजनेला कोणी हात लावायचा प्रयत्न केला तर लाडकी बहिणीच त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना म्हणाले की, आम्ही आलो की सर्व योजना बंद करणार, जेलमध्ये टाकणार असे विरोधक सांगत आहेत. पण कोणाला जेलमध्ये टाकणार, योजना बंद कोण करणार तुमची पोलखोल झाली अशी टीका करत तुमची पोलखोल कोविडमध्येच असताना झाली. तर काही जण तुरुंगातही गेले या सर्व योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नसल्याचेही यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, विरोधक आता खुलेआम बोलायला लागले आहेत. लोक विरोधात जातील, आता लाडकी बहिण योजनेला टच करायला गेलात तर त्याचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा असा उपरोधिक टोला लगावत आमच्या लाडक्या बहिणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आम्ही ठरवलं आहे की, बहिणींना लखपती बनविणार आहे. माझ्या बहिणींच काय ते बघा, माझं काय माझं काय बघुन उद्योजक पळून गेले. म्हणून ठरवलं की सामान्य माणसाला काय देणार सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस येणार म्हणून आम्ही काम करत असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही आमच्या सरकारचे रिपोर्ट कार्ड जाहीर केले असून केलेली कामंही रिपोर्टकार्डमध्ये बसत नसल्याचं सांगत रिपोर्ट कार्ड जाहिर करायला हिंमत लागते अशी टीकाही यावेळी विरोधकांवर केली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, विरोधी पक्ष यापूर्वी म्हणायचे की लाडकी बहिणीसाठी पैसे कुठून आणणार, मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी पैसे कुठून आणणार, सरकारकडे पैसे नाहीत अशी टीका करायचे दुसरीकडे मात्र टीका करणारे तेच नेते आता म्हणतात की, आमचं सरकार आल्यानंतर लाडकीय बहिणींना १५०० रूपये नाहीतर २००० रूपये करू, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाऱी करू असे सांगायतात. पण विरोधकांनी ठरवावं की राज्याच्या तिजोरीत पैसे आहेत की नाही नंतर मग टीका करावी असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
Marathi e-Batmya