शिवसेनेत बंडखोरी करत ५० आमदारांच्या समर्थनाच्या आधारे भाजपाच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीसाठी गेले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज भेट झाली. पंतप्रधानांनी जवळपास दिड तासांचा वेळ आम्हाला दिला. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला पंतप्रधानांनी इतका वेळ देणे ही मोठी बाब आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना विठ्ठल-रूक्मीणीची मुर्ती भेट म्हणून दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, राज्यात आलेले हे सरकार जनतेचे असून राज्यातील सर्व घटकांना पुढे घेवून जाण्याच्या अनुषंगाने काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी जी काही मदत असेल ती करण्याची तयारी पंतप्रधानांनी यावेळी दाखविली. याशिवाय या भेटीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिल्याचेही सांगितले.
राज्यात सध्या कायदेशीरदृष्ट्या अडचणीत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्याचा फैसला उद्या सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. यापार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे अटर्नी जनरल तुषार मेहता यांचीही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, होय आम्ही तुषार मेहता यांची भेटली घेतली. राज्यातील ओबीसीच्या प्रश्नावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडावी अशी विनंती करायला गेलो होतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीस आणि माझ्यात अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच भाजपा नेत्यांशींही चर्चा झाली नाही. मात्र उद्याची आषाढी एकादशीनंतर आम्ही मुंबईत चर्चा करू आणि त्यानंतर यासंदर्भातील माहिती जाहिर करू असेही ते म्हणाले.
तसेच यापूर्वी विधिमंडळ अधिवेशनाची तारीख १८ जुलै अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र आता त्या अधिवेशनाच्या दिवशीच राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. त्यामुळे अधिवेशनाची तारीख मागे-पुढे होईल असे सांगत १८ तारखेपासून होणारे पावसाळी अधिवेशन उशीरा होणार असल्याचे अप्रत्यक्ष त्यांनी सांगितले.
दरम्यान फडणवीस-शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार बंडखोर आमदारांच्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच होणार असून भाजपाच्या ८ तर शिंदे गटाच्या ५ मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @mieknathshinde
आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis
यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.@CMOMaharashtra pic.twitter.com/osNhFcgryR— PMO India (@PMOIndia) July 9, 2022
Marathi e-Batmya