त्या तलाठ्याच्या नियमबाह्य कृतीवरून मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी

नुकतेच राज्यातील ग्रामीण भागात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी तलाठ्याकडून एका महिलेकडून रोख रक्कम घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनातील कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब कसा केला जातो याचे प्रात्यक्षिकच या निमित्ताने राज्यातील जनतेला पाह्यला मिळालेले असतानाच या प्रकारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सज्जड इशारा देत या प्रकरणात जिल्ह्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे निर्देशही दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना देत ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही यावेळी दिले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देणे तसेच त्यानंतर योजनेचा फॉर्म भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात काल विधानभवन येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलदगतीने होईल यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, माता-भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या विविध योजना राज्य शासनाने आणल्या आहेत. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढण्यात आला. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही योजना म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने चोख नियोजन करावे, लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सक्त सूचनाही यावेळी दिल्या.

About Editor

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, परिवहन विभागात बदली आणि वसुलीचे मोठे रॅकेट मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

परिवहन विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत आरटीओ विभागातील बदल्या आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *