मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध कडक कारवाई करा

नागपूर हे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराची वेगळी संस्कृती आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारच्या घटना बरेच वर्षानंतर पहिल्यांदाच घडली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यादृष्टीने शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेत.

नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत शहरात घडलेल्या घटनेसंदर्भात आढावा घेतला. त्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पोलीस आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सहपोलीस आयुक्त निसार कांबळी, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील, प्रमोद शेवाळे, शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस उपायुक्त लोहीत मतानी, राहुल मदने, महेक स्वामी, विशेष शाखेचा पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.

शांतताप्रिय शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. या शहराला अशांत करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगजेबासंदर्भात दुपारी आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध पोलीसांनी कारवाई केल्यानंतरही समाजकटंकांकडून सायंकाळी दंगा भडकविण्यात आला. दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागाने तत्काळ कारवाई करुन दंगल आटोक्यात आणली. परंतु या दंगलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ व संपत्तीचे नुकसान झाले आहे. पोलिसांवरही दगडफेक केल्यामुळे ३४ पोलीस जखमी झाले आहेत. अशा प्रकारच्या घटना शहराच्या कुठल्याही भागात घडणार नाही यादृष्टीने पोलीस विभागाने सतर्क राहून कठोर कारवाई करावी, असे निर्देश यावेळी दिले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शहराच्या अकरा पोलीस स्टेशनच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. या संदर्भात १३ गुन्हे दाखल झाले असून १०४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी १२ विधी संघर्ष बालक आहेत. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच जनतेकडून प्राप्त झालेल्या कव्हरेज (व्हिडीओ क्लीप) च्या आधारे दंगलखोरांना शोधून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईचा सूचना देण्यात आल्या असून एकही दंगलखोर यामधून सुटणार नाही, अशी सूचना केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दंगल भडकविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या विविध समाज माध्यमांवरील पोस्टची तपासणी करुन अशा प्रकारच्या २५० पोस्ट शोधण्यात आल्या आहेत. या पोस्ट टाकणाऱ्या ६२ लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. अशा पोस्ट टाकणारे व शेअर करणाऱ्यांविरुद्ध दंगल भडकविल्याबद्दल सहआरोपी करण्याचे निर्देश यावेळी दिले.

झालेल्या नुकसानीची दंगलखोरांकडून भरपाई

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दंगलीमध्ये मालमत्तेचे तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. नुकसानीसंदर्भात पंचनामे करुन येत्या तीन ते चार दिवसात नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केली. तसेच संपूर्ण नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडून करण्यात येईल. नुकसान भरपाई करताना दंगलखोरांच्या मालमत्तेची विक्री करुन संपूर्ण भरपाई वसूल करण्यात येईल. यासाठी महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस विभागातर्फे संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश यावेळी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, दंगलीमध्ये ७१ वाहनांचे तसेच विविध मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानी संदर्भात जिल्हा प्रशासनाने पंचनामे सुरु केले आहे. वाहनांच्या नुकसानी संदर्भात विमा कंपन्यांना आवश्यक असलेले दस्ताऐवज उपलब्ध करुन देण्यासबंधी तात्काळ कारवाई करावी, अशी सूचना यावेळी केली.

शांतता राखण्यासाठी सहकार्य करा – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुख्यमंत्री फडणवीस शेवटी बोलताना म्हणाले की, शहरात आगामी काळात विविध समुदयांकडून सण व उत्सव आयोजित करण्यात येतात. अशा उत्सवाच्या प्रसंगी कुठलाही अनूचित प्रकार घडणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच सण व उत्सवाच्या काळात शांतता भंग होणार नाही यादृष्टीने जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जनतेला केले आहे. शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध पोलिस विभागाने तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

प्रारंभी पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल यांनी शहराच्या काही भागात भरलेल्या घटनेसंदर्भातील माहिती सादरीकरणाद्वारे दिली. या घटनेतील दोषी असणाऱ्या सर्वांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *