मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही कल्याण प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल

कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची अस्मिता आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केले.

कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधानपरिषद सदस्य ॲड. अनिल परब यांनी मांडलेल्या विधानपरिषद नियम २८९ अन्वये चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री ॲड. अनिल परब, शशिकांत शिंदे, अरुण उर्फ भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कल्याण येथील एका सोसायटीत अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीने भांडणात मराठी माणसाचा अवमान केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शुक्ला हा ‘एमटीडीसी’चा कर्मचारी असून त्याला निलंबित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र, मुंबई ही मराठी माणसाची अस्मिता आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील विविध समाज, समुदाय येत असतात आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक लोक मराठी भाषा उत्तम बोलतात, अनेक मराठी सण साजरे करतात. मात्र, अशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते, असेही यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखाद्याचा आहार कोणत्या पद्धतीचा, प्रकारचा असावा याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अशा तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

शेवटी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, देशातील वैविध्य टिकले पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. क्षेत्रिय अस्मिता म्हणजेच मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावर घाला घातल्यास सहन करणार नाही, असेही यावेळी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेची फलश्रुती गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० मुळे राज्यात जलसाठा क्षमता वाढ

राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *