मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, नाना पटोले जंयत पाटील यांना टोला प्रत्येक कामाला स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे आहे का

राज्यातील महायुती सरकारमधील आलबेल संबधावरून प्रसारमाध्यमातून दररोज काही ना काही वृत्त बाहेर येत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील मधुर संबधाच्या बातम्याही बाहेर येत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व चर्चांना उत्तर देत विरोधकांसह प्रसार माध्यमातील चर्चांनाही पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला.

विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुती सरकार सत्तेत आल्यापासून आपण १०० दिवसांचे मिशन हाती घेतले आहे. तालुका पातळीवर कार्यालये आहेत. त्यांना आपण सात पद्धतीच्या गोष्टी सांगितल्या. तेथील कार्यालयाच्या वेळा, कार्यालयाचे रेकॉर्ड, लोकांच्या भेटीच्या वेळा यासंदर्भात टार्गेट दिलेले आहे. १०० दिवसाच्या आढाव्यावर किती कामं केली याचा आढावाही घेत आहोत. यातील अनेक विभागांनी चांगली कामे केली असुन एक नवे कल्चर आपण आणत असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस सांगितले की, मागील काही दिवसांपासून माध्यमांची आवडती बातमी झाली आहे. काहीही झालं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला स्थगिती दिली. पहिल्यांदा एक लक्षात घेतलं पाहिजे की, कामांना स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही. मी यापूर्वीच सांगितलं आहे की, राज्याच्या हिताचं काम सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मी आणि अजित पवारही सोबत होतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जे काही निर्णय घेतले त्याची जबाबदारी एकट्या एकनाथ शिंदे यांची नाही तर आम्हा तिघांचीही असल्याचेही यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, आम्हाला आता काही खालच्या स्थरावर गडबडी होतात, त्या त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिली आहे. माझ्याकडे अनेक माहिती आहे. आता विभागीय आयुक्तांनी जरी स्थगिती दिली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचा दणका असे सांगत काही प्रसारमाध्यमांकडून वृत्त दिले जाते. मी जर बैठक बोलावली अन् कोणी गैरहजर राहिलं तर लगेच नाराज अशा बातम्या दिल्या जात आहेत. सध्या क्वालिटीच्य़ा बातम्याही दिसत नाहीत असे सांगत विरोधकांना सध्या क्लालिटीची टीका करता येत नाही असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर टीपण्णी करताना म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत काँग्रेस नेते नाना पटोले सहभागी नव्हते, या चर्चेत नाना पटोले नेमकं कुठं होते असा सवाल करत येथेही नाना पटोले यांचे नाव कापले की काय असा सवाल करत येथेही त्यांचा आवाज काँग्रेसकडून करण्यात येतोय का असा खोचक सवालही केला. तसेच मागील काही दिवसांपासून नाना पटोले रंगी बेरंगी कपडे घालून येत आहेत, त्यामुळे ते वेगळ्याच माहोलमध्ये आहेत अशी मिश्किल टीपण्णीही केली.

शेवटी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जयंत पाटील साहेब तुम्ही नेहमी चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहुन बोलता असे सांगत हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना मानणारे आणि आपलंस करून चालणारे सरकार आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा अवमान कधीही खपवून घेणार नसल्याचेही यावेळी सांगितले.

 

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *