मुंबईः प्रतिनिधी
विकास हा होणारच आहे. मात्र आपली समृद्धी नष्ट करणारा विकास अपेक्षित नाही. आमचा मेट्रोला विरोध नाही. मात्र त्याविषयी सविस्तर माहिती घेतल्याविना तेथील झाडांचे एकही पान तोडता येणार नसल्याचे सांगत कारशेड प्रकल्पाला स्थगिती देत याचा आढावा घेतल्याशिवाय कारशेडच्या कामाला प्रारंभ केला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
भाजप शासनाच्या काळात मेट्रो ३ च्या कारशेड उभारणीसाठी रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली होती. तसेच सरकारच्या या कामकाजाच्या विरोधात जनतेत मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला. या विरोधाला डावलून भाजप शासनाने हे काम चालू ठेवले होते. अखेर हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीला स्थगिती दिली.
लोकांचा रोष पाहून आमचे सरकार आल्यानंतर आरेच्या जंगलाला वन घोषित करण्याची घोषणा त्यावेळी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचे पहिले पाऊल टाकल्याचे बोलले जात आहे.
कारभार मातोश्रीवरून की वर्षावरून?
मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीसाठी वर्षा हे शासकिय निवासस्थान आहे. मात्र उद्धव ठाकरे हे मुंबईचे रहिवासी असल्याने राज्याचा काराभार वर्षावरून चालविणार की मातोश्री या आपल्या निवासस्थानावरून चालविणार असा प्रश्न प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींनी उपस्थित केला असता ते म्हणाले की, सरकारी कामासाठी जे जे अनिवार्य असेल ते सर्व करण्याचा प्रयत्न करेन असे सांगत कारभारासाठी वर्षावर जाण्याची शक्यता त्यांनी अप्रत्यक्ष फेटाळून लावली.
लॉंड्रीत धुतला तरी हा भगवा रंग जाणार नाही
मुख्यमंत्री ठाकरे यांनी पदाची शपथ घेतानाही काल भगवा रंगाचा नेहरू शर्ट घातला होता. त्याच रंगाचा शर्ट त्यांनी आजही घातला होता. त्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, हा भगवा रंग आमचा असून तो कोणत्याही लॉंड्रीत धुतला तरी तो जाणार नसल्याचे सांगत हे सरकार हिंदूत्वावादीच राहणार असल्याचे त्यांनी एकप्रकारे स्पष्ट केले.
Marathi e-Batmya