भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे धार्मिक तेढ निर्माण करमारे विधान केले असून त्यांचे वक्तव्य भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वे व कायद्याच्या राज्याला उघड आव्हान देणारे आहे. संविधानाची शपथ घेतलेल्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे द्वेष पसरवण्याचा आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अधिकार नाही. या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून एफआयआर FIR दाखल करा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केल्याचे काँग्रेस सरचिटणीस जोजो थॉमस यांनी सांगितले.
भाजपा विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या द्वेषपूर्ण भाषणाचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जोजो थॉमस यांनी तीव्र शब्दांत निषेध केला करत म्हणाले की, १७ जून रोजी सांगली जिल्ह्यातील गुंडेवाडी येथे आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी केलेली विधाने, संवैधानिक हक्कांचे आणि सध्याच्या कायदेशीर तरतुदींचे उघड उल्लंघन आहेत. ज्या बाबींवर लोकप्रतिनिधींना अधिकार नाही, अशा गोष्टींमध्ये लोकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करणे, विशिष्ट धार्मिक समुदायांविरुद्ध द्वेष पसरवणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये धार्मिक भेदभावाची मागणी करणे अत्यंत गंभीर आहे. जमावाला कायदा हातात घेण्यास प्रवृत्त करणे आणि अशा कृत्यांसाठी बक्षीस देण्याचे आश्वासन देणे हे कायद्याचे गंभीर उल्लंघन असल्याचेही सांगितले.
जोजो थॉमस म्हणाले की, आमदार पडळकर यांची विधाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४ (समतेचा अधिकार), १५ (भेदभाव करण्यास प्रतिबंध), २५ (धर्म स्वातंत्र्याचा अधिकार) आणि २६ (धार्मिक बाबींचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य) चे थेट उल्लंघन करणारी आहेत. याव्यतिरिक्त, त्यांचे भाषण भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ (विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), २९५ अ (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून केलेले दुष्ट कृत्य), आणि ५०५ (सार्वजनिक उपद्रव निर्माण करणारी विधाने) अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांसारखे आहे.
भाजपा ख्रिश्चन बांधवांबद्दल दुहेरी भूमिका घेत असल्याचा आरोपही जोजो थॉमस यांनी केला.”एकीकडे, भाजपाचे आमदार ख्रिश्चन धर्मगुरू यांच्यावर हल्ला करत आहेत, तर दुसरीकडे, ख्रिश्चनांची संख्या जास्त असलेल्या केरळसारख्या राज्यांमध्ये भाजपचे नेतृत्व ख्रिश्चनांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. यातून त्यांचा खरा चेहरा उघड होतो, असे यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya