गृहमंत्री अनिल देशमुख तुमचे ‘ते‘ पत्रक खरे आहे का? खुलासा करण्याची भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

दिल्लीतील निझामुद्दीन येथील मरकज येथील कार्यक्रमाला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे उपस्थित असल्याबाबत आणि तब्लीगीच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परवानगी का नाकारली नाही असा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याचे निवेदन काल सोशल मिडीयावर उपलब्ध झाले. मात्र हे पत्र गृहमंत्री देशमुख यांचेच असल्याबाबत संशय असल्याने त्यांनी याबाबतची सत्यता जाहीर करावी अशी मागणी भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केली.

कालपासून समाज माध्यमांवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या लेटरहेडवर लिहीलेले एक पत्र/प्रेस रिलीज/निवेदन फिरत आहे. सदर पत्र/प्रेस रिलीज/निवेदनाच्या सत्यतेबद्दल साशंकता असून त्यामुळे लोकांमधे संभ्रम निर्माण झालेला आहे. वृत्तपत्रे व प्रसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्या काही मंडळींचा असा दावा आहे की हे पत्र/प्रेस रिलीज/निवेदन हे गृहमंत्र्यांच्या कार्यालयामार्फत त्यांना पाठवले गेले आहे तर काही प्रसार माध्यमे हे पत्र खोटे अथवा बनावट असल्याचा दावा करत असल्याचे ते म्हणाले.

प्रथम दर्शनी ते पत्र/प्रेस रिलीज/निवेदन हे खोटे असल्याचे भासते. त्यातील भाषा बघता ती सरकारी किंवा औपचारिक भाषा नसून अतिशय अनौपचारिक भाषेत ते लिहिले गेले आहे. ते कोणा प्रति लिहीले आहे किंवा प्रेस रिलीज असल्यास ‘प्रसिद्धीसाठी‘ असेही त्यात लिहिण्यात आलेले नसल्याने ते पत्र/प्रेस रिलीज/निवेदन यापैकी नेमके काय आहे हे कळत नाही आणि त्यामुळे त्याबाबतचा संभ्रम अधिकच वाढत आहे. जर सदर पत्र/प्रेस रिलीज/निवेदन खोटे असेल तर हा एक गंभीर गुन्हा आहे आणि सदर गुन्हा जर राज्याच्या गृहमंत्र्यांच्या बाबतीत घडत असेल तर ती अधिकच गंभीर बाब असून त्यांनी लवकरात लवकर खुलासा करावा. तसेच सदर पत्र/प्रेस रिलीज/निवेदन खोटे असल्यास त्यासंबंधी कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

About Editor

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *