मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने सीएसआर देणगी समन्वयाचे उत्कृष्ट काम करुन लाखो आपत्तीग्रस्तांना मोठी मदत मिळवून दिली. यासाठी सोसायटीमार्फत धैर्य मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत विविध कॉर्पोरेट्स आणि खाजगी देणगीदारांकडून ५२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकारच्या मदत साहित्याची उभारणी आणि त्याचे गरजुंना वाटप करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
आतापर्यंत मिळालेल्या मदत साहित्यात सुमारे ८ लाख सर्जिकल मास्क, ४६ व्हेंटीलेटर्स, ८५ हजार पीपीई किट्स, २ लाख २५ हजार एन ९५ मास्क, ३८ हजार लिटर्स सॅनिटायझर इत्यादी सामग्रीचा समावेश आहे. त्याचबरोबर मागील तीन महिन्यांमध्ये नाविन्यता सोसायटीने ३५ लाखाहून अधिक लोकांना जेवण, १ लाख किराणा सामान किटस, १४ लाख सॅनिटरी पॅडची व्यवस्था केली आहे, याशिवाय सोसायटीने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेडच्या सहकार्याने जे. जे. हॉस्पिटलमध्ये कोविड – १९ चाचणी प्रयोगशाळेची स्थापना देखील केली.
सर्जिकल मास्क, पीपीई किट्स, सॅनिटायझरचे वाटप
आतापर्यंत मिळालेली सर्जिकल मास्क, व्हेंटीलेटर्स, पीपीई किट्स, एन ९५ मास्क, सॅनिटायझर ही सामग्री हाफकीन संस्था, जे. जे. हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस दल, बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका यांना उपलब्ध करुन देण्यात आली. मुख्य देणगीदारांमध्ये कॅस्ट्रॉल इंडिया, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, विप्रो फाउंडेशन, एचटी पारेख फाउंडेशन, नोव्हार्टिस इंडिया, फाइझर लि., डीएल शाह ट्रस्ट, गोदरेज ग्रुप, अमेरिकेअर्स, पेटीएम, रेकिट बेनस्कीसर इत्यादींचा समावेश आहे. या कंपन्यांनी ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची मदत केली.
३५ लाखापेक्षा अधिक लोकांना जेवण
वैद्यकीय उपकरणांव्यतिरिक्त नाविन्यता सोसायटीने स्थलांतरित मजूर, दैनंदिन मजुरी करणारे नागरिक, झोपडपट्टीवासीय, कंटेंनमेंट झोनमधील नागरिक तसेच फ्रंटलाइन कामगारांना मुबलक प्रमाणात अन्न पुरवण्याच्या कामातही योगदान दिले. मागील तीन महिन्यांमध्ये ३५ लाखापेक्षा अधिक लोकांना जेवण, १ लाख किराणा सामान किट्स, १४ लाखाहून अधिक सॅनिटरी पॅडची व्यवस्था केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, नवी मुंबई महानगरपालिका, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई पोलिस या क्षेत्रातील लाभार्थ्यांचा यात समावेश आहे. सर नेस वाडिया फाऊंडेशन, युनिसेफ, डीएल शाह ट्रस्ट, बीसीजी ग्रुप, सीआयआय, टेस्टी बाइट्स, गोदरेज ग्रुप, क्रेडो फाऊंडेशन, प्रोजेक्ट मुंबई, सीएसीआर फाऊंडेशन, जायन्ट्स ग्रुप ऑफ भायखळा, श्री रेणुका शुगर्स लिमिटेड, अदानी ग्रुप यांसारख्या प्रमुख देणगीदार आणि भागीदारांचा समावेश आहे. यामाध्यमातून नाविन्यता सोसायटीला २२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची मदत उभारण्यात यश आले आहे.
स्थलांतरित कामगारांना मदत
युनिसेफद्वारे स्थलांतरित कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या जीवन रथ प्रकल्पासही नाविन्यता सोसायटीकडून सहकार्य करण्यात आले. वेगवेगळ्या रेल्वे स्थानक आणि टोलनाक्यांवर सुमारे १.५ कोटी रुपये किंमतीच्या मदत साहित्याचे वाटप करण्यात आले. श्रमिक एक्स्प्रेस आणि राज्य परिवहन बसेसमधून प्रवास करणारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना अन्न, पाणी, औषधे आणि पादत्राणे इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.
Marathi e-Batmya