राज्यपालांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्री म्हणाले, परिक्षेपेक्षा शिक्षण महत्वाचे एचएसएनसी समुह विद्यापीठाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द करण्यावरून निर्माण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणात काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वक्तव्य केल्यानंतर आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या आपलकालीन परिस्थितीत परिक्षा घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे देता येईल हे पाहणे महत्वाचे असल्याचे सांगत परिक्षा रद्दच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एचएसएनसी समुह विद्यापीठाच्या ऑनलाईन उद्घाटनासाठी राज्यपाला भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या इतर अधिकारी आणि विद्यापीठाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाचे तर विद्यापीठाच्या वेबसाईटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
तर जाणून घेवू या काय म्हणाले राज्यपाल आणि मुख्यमंत्री
दर्जेदार शिक्षणाबरोबरच कौशल्याधारीत शिक्षण महत्वाचे-राज्यपाल
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्य आधारीत शिक्षण आणि प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यापूर्वी संशोधनाकडे विद्यार्थ्यांचे अधिक लक्ष होते. जागतीकीकरणामुळे संशोधनाबरोबरच कौशल्य आधारीत शिक्षणाची गरज आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाच्या (रुसा) माध्यमातून विविध महाविद्यालयांनी एकत्र येऊन समुह विद्यापीठ स्थापन करावेत. त्यामुळे नव नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकता येतील. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन एक मिशन म्हणून पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एचएसएनसी समुह विद्यापीठांच्या उद्‌घाटन प्रसंगी केले.

आपत्कालिन परिस्थितीत परीक्षेपेक्षा शिक्षण सुरु राहीले पाहिजे- मुख्यमंत्री
शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच तंत्रज्ञानाच्या कोणत्याही आपत्कालिन परिस्थितीमध्ये शिक्षण कसे सुरु राहील यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करुन परीक्षा कधी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसे सुरु राहील याकडे सर्वानी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर आनंद मिळतोच पण ते शिक्षण घेताना अधिक आनंदी राहून ते कसे यशस्वी होतील याकडे महाविद्यालयांनी लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एचएसएनसी समुह विद्यापीठाच्या उद्‌घाटन प्रसंगी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षण हे जीवनावश्यक असल्याने चौकटबद्ध शिक्षणापेक्षा आनंदाने जगण्याची कला शिकविणारे शिक्षण असले पाहिजे. या समुह विद्यापीठामुळे शैक्षणिक दर्जा उंचावण्याबरोबरच नवनवीन अभ्यासक्रमाचे स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा कला, संगीत, आरोग्य, कृषी, क्रीडा आशा विविघ विषयात कोणत्याही वयात शिक्षण घेता येईल आणि विद्यार्थी आपली कला जोपासतील. मी सुद्धा कला शाखेचा विद्यार्थी आहे. मी मुख्यमंत्री झालो नसतो तर चांगला कलाकार झालो असतो. असे सांगुन मला अजूनही शिक्षण घेण्यास आवडेल, असेही ते म्हणाले.
शि‍क्षित, सुशिक्षित आणि सुसंस्कृत असे देशाचे भवितव्य घडविणारे शिल्पकार आपण तयार करत आहात. जागतीकीकरणामध्ये शिक्षण क्षेत्रात बदल होत आहेत. मात्र शिक्षणाची भूक मात्र तीच कायम आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. याचा फायदा आपत्कालिन परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना होत आहे. या विद्यापीठामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही वयात शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येतील. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एचएसएनसी समुह विद्यापीठाच्या वेबसाईटचे ऑनलाईन उद्‌घाटन करण्यात आले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, महानगराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी समुह विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा कौशल्य विकास आधारीत शिक्षण घेता येईल. शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेबरोबरच दर्जेदार शिक्षणासाठी शासन प्रयत्न करत आहेत. व्हर्टिकल युनिव्हर्सिटीसाठीसुद्धा शासनाने समिती गठित केली आहे.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, एचएसएनसी समुह विद्यापीठाचे प्रमुख निरंजन हिरानंदनी, महाविद्यालयांचे प्राध्यापक सहभागी होते.

About Editor

Check Also

टीईटी परिक्षे दरम्यान महिलांना मंगळसूत्र-दागिने काढायला लावले, अंबादास दानवे यांचा संताप संभाजी नगरमधील घटनेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर

राज्यात टीईटी परिक्षा होत आहे. परिक्षेसाठी परिक्षार्थी परिक्षा केंद्रावर जमा झाले. छत्रपती संभाजी नगर मध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *