Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचा दावा, एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ५२.४६ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात राज्यात सव्वा दोन वर्षांत ३.१४ लाख कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक

देशातील एकूण परकीय गुंतवणूकीची एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीची आकडेवारी समोर आली असून देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असून राज्याने परकीय गुंतवणुकीत आपले अव्वल स्थान कायम राखले असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यातील एकूण परकीय गुंतवणुकीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात २०१४ ते २०१९ या काळात सत्तेत असताना एकूण ३ लाख ६२ हजार १६१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. आता सव्वा दोन वर्षांत ३ लाख १४ हजार ३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक शासनाने राज्यात आणली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी असल्याने एकूण गुंवणुकीचा आकडा आणखी वाढणार आहे.

उद्योगस्नेही धोरणामुळे राज्य गेले दोन वर्षे सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एकवर राहिले आहे. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही १ लाख ३४ हजार ९५९ कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी ७० हजार ७९५ कोटी अर्थात ५२.४६ टक्के गुंतवणूक राज्यात आली आहे. कर्नाटक, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू, हरयाणा, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांमध्ये झालेल्या गुंतवणुकीच्या एकत्रित बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात २०२२-२३ मध्ये १ लाख १८ हजार ४२२ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली होती जी कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक होती, २०२३-२४ मध्ये १ लाख २५ हजार १०१ कोटी रुपये गुंतवणूक राज्यात आली होती जी गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात व कर्नाटक यांच्या एकत्रित बेरजेहून अधिक होती.

एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत राज्यांमध्ये झालेली गुंतवणूक : पहिला क्रमांक महाराष्ट्र (७०,७९५ कोटी), दुसरा कर्नाटक (१९,०५९ कोटी), तिसरा दिल्ली (१०,७८८ कोटी), चौथा तेलंगणा (९०२३ कोटी), पाचवा गुजरात (८५०८ कोटी), सहावा तामिळनाडू (८३२५ कोटी), सातवा हरियाणा (५८१८ कोटी), आठवा उत्तरप्रदेश (३७० कोटी), नववा राजस्थान (३११ कोटी) याप्रमाणे आहे.

 

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *