राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुणे मेट्रो आणि बसमध्ये सवलत आणि मोफत प्रवासाची घोषणा दिल्यानंतर आता एसटीमधील सवलतीप्रमाणे मुंबईत बेस्ट बसमध्ये लाडक्या बहिणींना तिकिट दरात ५० टक्के सवलत देण्याचे आश्वासन शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचा वचननामा जाहीर करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच पागडीमुक्त मुंबई, झोपडपट्टीमुक्त मुंबई, ४० लाख परवडणारी घरे, प्रदूषणमुक्त मुंबई करण्याबरोबरच मुंबईबाहेर गेलेल्या मूळ मुंबईकराला पुन्हा सन्मानाने परत आणून त्याला हक्काचं घरं देण्याचं वचन महायुतीने दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुढच्या पाच वर्षात मुंबईला जागतिक दर्जाचं शहर करण्याचे महायुतीचे वचन आहे. मागील साडेतीन वर्षात मुंबईत विकास कामे केली आणि आता विकासाचा आणखी वेग वाढवायचा आहे, मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृतीचं रक्षण करण्याचे वचन महायुतीकडून देण्यात आले आहे. मुंबईतील सर्वसामान्यांचे घरांचे प्रश्न सोडवणे, पागडी इमारतींचा पुनर्विकास, २० हजार जुन्या इमारतींना ओसी, फनेल झोनबाधित इमारतींचा पुनर्विकास, क्लस्टर योजना, १ लाख १० हजार गिरणी कामगारांना घरं देणार, झोपडपट्टीमुक्त मुंबई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी मुंबईत ४० लाख परवडणारी घरं देण्याचे महायुतीचे आश्वासन असल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, पुनर्विकासातील सर्व अडथळे दूर केले असून पुढील पाच वर्षात मुंबईत पुनर्विकासाला चालना मिळेल आणि धोकादायक इमारतींमध्ये रहिवाशांना सुसज्ज फ्लॅट मिळतील, लाडक्या बहीणींसाठी बेस्ट प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच बचत गटांना ५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने मराठी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम राबवणार असल्याची घोषणाही यावेळी केली.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईचे पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण रोखण्यासाठी १७००० कोटी खर्च केले जाणार आहेत. मुंबईत बांग्लादेशी आणि रोहिंग्याना शोधून त्यांना परत पाठवणार, मराठी सिनेमांसाठी मल्टीप्लेक्स, तीन नवीन नाट्यगृह, एआयआधारित भ्रष्टाचार मुंबईचा संकल्प महायुतीकडून करण्यात आला.
आमचा विकासनामा तर त्यांचा टोमणेनामा, घोटाळेनामा
एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मराठीबाबत त्यांनी एकही काम केलं नाही. मराठीबाबत त्यांचे पुतना मावशीचे प्रेम निवडणुकीवेळी उतू लागतं, अशी टीका करत महायुती कायम मराठी माणसांच्या मागे उभी राहिली, कल्याणकारी योजना आणि विकासाचा अंजेडा घेऊन महायुती पुढे चालली आहे. पण त्यांचा टोमणेनामा आणि घोटाळेनामा असल्याची टीकाही यावेळी केली.
खर्च झाला तरीही महापालिकेतील ठेवी वाढल्या
महापालिकेच्या ठेवी कमी झाल्या या उबाठाच्या टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वर्ष २०१९ मध्ये मुंबई महापालिकेत ७६ हजार ५७९ कोटींच्या ठेवी होत्या आणि भांडवली खर्च ५ हजार ४३२ कोटी होता. २०२० मध्ये ठेवी ७६ हजार ९०० कोटी आणि खर्चाचा आकडा ७ हजार ९०० कोटीपर्यंत वाढला. २०२१ मध्ये ठेवी ७८ हजार ७४५ कोटी आणि खर्च ९ हजार ३४५ कोटी होता. ३१ मार्च २०२२ रोजी ठेवी ९१ हजार ६९० कोटीपर्यंत वाढले. यात मुद्रांक शुल्क सवलत, प्रिमीयम सवलतीमुळे उत्पन्न वाढले. आजच्या घडीला २० हजार १६६ कोटींचा खर्च करुन देखील पालिकेच्या ठेवी ८० हजार ४१५ कोटींपर्यंत वाढल्या आहेत, अशी माहितीही यावेळी देत लोकांसाठी खर्च करुन देखील महापालिकेच्या ठेवी वाढल्या आहेत. यापूर्वी पैसे कुठे जात होते, असा सवालही केला.
वचननाम्यातील ठळक घोषणा
– मुंबईला पाणीपुरवठा वाढवण्यासाठी पुढील ५ वर्षात गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार
– पर्यावरण संवर्धन योजनेमार्फत १७ हजार कोटी रुपये
– बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार
– सर्व भाजी मंडईचे नुतनीकरण आणि पुर्नविकास करणार
– फिश इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सेंटर स्थापन करण्यात येणार
– लघु उद्योग धोरण राबवले जाणार
– पुर्नविकासाला जलदगती देणार, पागडीमुक्त मुंबई आणि फनेल झोनप्रश्नी जाहीर केलेली योजना जलदगतीने राबविणार
– बेस्टमध्ये २०२९ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस
– बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत
– बेस्ट बसेसची संख्या ५ हजारवरुन १० हजारांवर जाणार
– स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरची उभारणी करणार
– लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी व लघु उद्योग स्थापन करण्यासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
– रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबई करणार
– पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार
– मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करणार
– बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्ताने मराठी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम आणि आर्थिक तरतूद राबवली जाणार
– पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाची स्थापना करणार
– हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारणार
– रविंद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर अन्य नाट्यगृहांचा पुर्नविकास करणार आणि गरज पडल्यास ३ नवीन नाट्यगृहे उभारणार
– विकसित मुंबईसाठी २०३४ चा आराखडा तयार होणार
Marathi e-Batmya