राज ठाकरे यांनी मुंबईसह देशातील अदानीला दिलेल्या प्रकल्पाची यादी दाखवत म्हणाले… मुंबईला गुजरातला नेऊन जोडण्याचे षडयंत्र सुरुय

मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीची पहिली सभा शिवाजी पार्कवर पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मुंबईसह संपूर्ण देशभरात मागील १० वर्षात भाजपा सरकारच्या आर्शिवादाने एका अदानीला किती प्रकल्प देण्यात आले याचा नकाशा दाखवत पुढे म्हणाले की, अदानीसाठी आधी मुंबई आणि मग महाराष्ट्र आणि आता देशच विकायला काढला असल्याचे दिसून येत आहे. सगळे प्रकल्प एकट्या अदानीलाच दिले आहेत. या माध्यमातून आपल्या भोवतीचा फास कसा आवळला जात आहे ते समजून घेण्याची गरज असल्याचे मतही यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थितांच्या नजरेस आणून दिली.

यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, २० वर्षानंतर मी पहिल्यादाच युती केली आहे. या युतीमुळे अनेकांना उमेदवारी देता आली नाही. त्यामुळे अनेक जण नाराज झाले असतील, काही जण नाराज झाले, काही दुखावले अशा अनेक गोष्टी झाल्या-होत असतात, काही गोष्टी आमच्याही हातात नसतात. पण कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता. पण ते कितीही नाराज झाले असतील तर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो असे सभेच्या सुरुवातीला जाहिर केले.

भाजपावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, तिकडे अकोटमध्ये भाजपाने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये भाजपाने काँग्रेसशी युती केली. तर ६६ जण बिनविरोध निवडूण आले. म्हणजे तिकडच्या मतदारांचा अधिकारच काढून टाकला. आज ६६ नगरसेवक बिनविरोध नगरसेवक निवडून आले, पण हे आकडे पुढे आणखी वाढत जातील. वाईट वाटतं की लोक विकले जात आहेत. तुळजापूरमध्ये ड्रग्ज रॅकेटमधील एका व्यक्तीला उमेदवारी दिली. बदलापूरमध्ये बलात्कार प्रकरणातील एका व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक केलं.हि हिम्मत कुठून आली, हा उद्दामपणा, ही मस्ती कुठून आली असा सवालही भाजपाला केला.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अख्खा महाराष्ट्र आणि देश विकायला काढला आहे, आपल्यासमोर काढून ठेवलंय याचा आपल्याला अंदाज नाही. लोकसभा निवडणूकीनंतर मला एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीने मला जी माहिती दिली, त्यानंतर माझी टीम कामाला लागली. ते मी सगळं आज या ठिकाणी दाखवतो. मला असं वाटतं की हे पाहिल्यानंतर जर आपल्याला भिती वाटली तर यापुढे निवडणूका न लढवलेल्याच बऱ्या असा इशाराही यावेळी दिला.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले २०२४ च्या निवडणूका झाल्यानंतर मला माहिती समजल्यानंतर धक्काच बसला, हिंदी, इंग्रजी चॅनल्स असं सगळं ब्लॉक करून टाकलं आहे. कोणी काही तुम्हाला दाखवणार पण नाही. मी तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा भारताचा नकाशा दाखवतो, २०१४ साली गौतम अदानी यांचे किती प्रोजेक्ट किती होते याची ही आकडेवारी, म्हणजे मोदी पंतप्रधान होण्या आधी गौतम अदानी कुठे होते आणि त्यानंतर गौतम अदानी कुठे आहेत असा सवाल करत राज ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्या प्रकल्पाची यादीच दाखविली.

यावेळी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन करताना म्हणाले की, आम्ही आमच्या वचननाम्यात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. उद्धव ठाकरे हे तुम्हाला सांगू शकतील. आम्ही हे शहर उत्तम करू शकतो, पण तुम्ही आमच्याबरोबर असलात तर हे शक्य होईल, इथे मराठी माणसाची किंमत केली जाते, मराठी माणूस विकला जातोय हे त्यांना माहित आहे. विकणारेही मराठीच आहेत.आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा. आजची ही निवडणूक ही मराठी माणसांसाठी शेवटची निवडणूक आहे हे लक्षात ठेवा. मुंबई गेली तर इथल्या पुतळ्यांना काय अर्थ उरतो, ते पुतळे म्हणतील आमचा मराठी माणूस बेसावध राहिला, त्यामुळे आम्हाला मुंबई गमवावी लागली. कुठेही दुबार मतदार दिसला तर तिथल्या तिथे फोडून काढा, सतर्क राहा असे आवाहनही यावेळी केले.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *