एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व आचार आदर्श मानून राज्य शासनाची वाटचाल सुरु आहे. पाचाड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती देणारी  भव्य दिव्य शिवसृष्टी उभारली जाणार असून, त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार  ३५२ वा राज्याभिषेक दिन सोहळा आज जेष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी दुर्गराज रायगडवर उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, रोहयो मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी किशन जावळे,पोलीस अधीक्षक आचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह सुरेश पवार, नितिन पावळे आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवभक्त उपस्थित होते.

सर्वप्रथम शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही पवित्र भूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. ३५२ वर्षांपूर्वी जर शिवराज्याभिषेक झाला नसता, तर आज आपण इथे नसतो. त्यांच्या दूरदृष्टी मुळे स्वराज्याचा पाया घालण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जात-पात, धर्म, वर्ण या पलीकडे जाऊन रयतेचे राज्य प्रस्थापित केले. त्यामुळे ते फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे राष्ट्रनायक आहेत. पाकिस्तान बाबत जी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. त्यामागे देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचीच प्रेरणा आहे, असेही सांगितले.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, काळ कितीही पुढे गेला आणि आपण कितीही तंत्रज्ञानाच्या गोष्टी केल्या तरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा आपण कुणीच विसरू शकणार नाही. राज्य शासनाने गडकोट किल्ले आणि मंदिरांचे जतन, संवर्धन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची ओळख नव्याने करुन देण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन आपण पर्यटनाला चालना देतो आहे. त्यासाठी भारत गौरव यात्रेच्या माध्यमातून ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन’ सुरु केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ट्रेनला आज हिरवा झेंडा दाखवला असून या विशेष रेल्वे च्या माध्यमातून नागरिकांना ऐतिहासिक किल्ले आणि गडकोट पाहता येणार आहेत असेही यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील “ऑपरेशन सिंदूर” मध्ये सहभागी वीर सैनिकांना मानवंदना दिली. त्यांनी शिवसृष्टीसाठी शासनाने मंजूर केलेल्या ५० कोटी रुपयांच्या निधीबाबत आराखडा तयार असून लवकरच काम सुरु होणार असल्याची माहिती दिली. “वारा, पाऊस, ऊन याची तमा न बाळगता स्वखर्चाने रायगडावर येऊन दोन दिवस सतत सेवा करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे आभार मानले.

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना रायगड पोलीस दलाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध शाहिरी कार्यक्रम, लोकनृत्ये, युद्धकलेचे सादरीकरण आणि मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक यामुळे रायगडावर शिवकाल अनुभवण्याचा अद्वितीय क्षण उपस्थितांना लाभला.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *