पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आवाहन; वेळ गेलेली नाही, कुटुंबप्रमुख म्हणून काळजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचा झेंडा फडकावला. त्यानंतर आता शिवसेना नेमकी कोणाची खरी यावरून एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात अप्रत्यक्ष न्यायालयीन लढाई सुरु झाली. त्यातच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यामुळे अखेर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा आवाहन करत अजूनही वेळ गेलेली नाही, या माझ्यासमोर बसा एकत्र मार्ग काढू. मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हा सर्वांची काळजी वाटते अशी आर्त साद घातली.

एकनाथ शिंदे यांनी २० जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान केल्यानंतर सुरुवातीला १२ आमदारांना घेवून सूरत गाठले. त्यानंतर सूरतहून त्यांनी थेट गुवाहाटीला प्रयाण केले. त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार कधी एकट्याने तर कधी दुकटीने तर कधी ग्रुपने शिंदे गटात सहभागी होण्यास सुरुवात केली. त्यामुळे आजस्थितीला उध्दव ठाकरे यांच्या गटात जवळपास १५ ते १६ आमदारच राहिले आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून रोज एका आमदाराचे म्हणणे किंवा हिंदूत्वाचा नारा देणाऱे एखादे पत्र ट्विट करत महाविकास आघाडीला विरोध असल्याचा नारा लगाविण्यात येत आहे.

यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेतील इतर नेत्यांकडून सातत्याने शिंदे गटातील आमदारांशी संपर्क साधण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आजस्थितीला शिंदे गटातील २० ते २१ आमदार उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे अखेर आज मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना आवाहन केले. यावेळी आवाहन करताना उध्दव ठाकरे यांनी मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून तुमच्या भावनांचा आदर करतो असे सांगत या माझ्यासमोर बसा चर्चेतून मार्ग काढू. शिवसैनिक आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा यातून निश्चित मार्ग निघेल असे सांगत कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल असे आश्वासन देत शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत असल्याचेही जाणीव उध्दव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना करून दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केलेले आवाहन खालील प्रमाणे

शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो
जय महाराष्ट्र !
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात . आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.
आपला नम्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे

About Editor

Check Also

रोहित पवार यांचा आरोप, अजित पवार यांच्या विमान अपघातात प्रभावशाली लोक या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र या विमान अपघातावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *