विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने अकराव्या जागेसाठी जबरदस्त चुरस वाढली. अकराव्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार की दोघांना आपापसात झुंज द्यावी लागणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पुरस्कृत जयंत पाटील यांचा पराभव झाला. तर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार मिलिंद नार्वेकर यांचे पॉवर पॉलिटीक्समधून या निवडणूकीच्या निमित्ताने संसदीय राजकारणात आगमन झाले आहे. तर मागील पाच वर्षाहून अधिक काळ राजकिय पुर्नवसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या विजयामुळे त्याही पुन्हा एकदा विधिमंडळात प्रवेशिता झाल्या.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज दिवसभर मतदान पार पडले. त्यानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. मात्र मतमोजणीत गतवेळी काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांच्याबाबतीत ज्या पध्दतीने मतांचे नियोजन करून पराभव करण्यात आला. अगदी त्याच पध्दतीने यावेळी शेकापचे जयंत पाटील यांच्या विरोधात मतांचे नियोजन करत त्यांचा पराभव करण्यात आला.
त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणूकीत महायुतीतील भाजपा, अजित पवार यांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या उमेदवार सहजरित्या विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीच्या आघाडीला गालबोट लागल्याचे चित्र निर्माण झाले.
वास्तविक पाहता सध्याच्या विधानसभेतील संख्याबळाचा विचार भाजपाचे १०३, अजित पवार यांच्याकडे ४२, आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ४२ आमदारांची संख्या आहे. या संख्या बळाचा विचार करता भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्यासह योगेश टिळेकर, परिणय फुके,अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत या उमेदवारांचा सहज विजयी होणार होते. त्यानुसार सदाभाऊ खोत यांना दुसऱ्या पसंतीची मते देत इतर उमेदवार पहिल्या फेरीच्या मतदानात विजयी झाले. या सर्व उमेदवारांना प्रत्येकी उमेदवार २६ मतांचा कोटा भाजपाने निश्चित केला होता.
तसेच अजित पवार गटाने उभे केलेले राजेश विटेकर यांना २३ आणि शिवाजीराव गर्जे यांनाही पहिल्या फेरीतील २४ मते मिळत या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या उमेदवार भावना गवळी यांना २४ मते मिळाली आणि कृपाल तुमाने यांना २५ मते मिळाल्याने या दोघांचाही पहिल्या फेरीतील शिवसेनेच्या आमदारांची मते मिळली. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांचा निर्विवाद विजय झाला.
तर महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जयंत पाटील यांना काँग्रेस आणि शिवसेनेकडून फारसी मते मिळाली नाहीत. त्यामुळे जयंत पाटील यांना १२ मतांवरच समाधान मानावे लागले. तर शिवसेना उबाठाकडून गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरविण्यात आले होते. तसेच नार्वेकर यांच्या पाठिशी शिवसेना उबाठा गटाकडून ताकद देण्यात आली नसल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मिलिंद नार्वेकर हे पहिल्या पसंतीची २४ मते मिळवित विजयी झाले. तर काँग्रेसकडून मागील वेळेप्रमाणे प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने पक्षाची २५ मते देत त्यांचा विजय निश्चित केला. मात्र उर्वरित मते जयंत पाटील यांना मिळणे अपेक्षित असताना ती मते मिळाली नसल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे.
तर दुसऱ्याबाजूला काँग्रेसचे आमदार अंतापूरकर, झिशान सिद्धीकी यांच्यासह ७ मते फुटुन ती महायुतीच्या उमेदवारांना मिळाल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली. दरम्यान क्रॉस व्होटींग करणाऱ्या काँग्रेस आमदारांची नावे पुढे येऊ शकली नाहीत. मात्र त्या आमदारांबाबत पक्ष नेत्यांना यापूर्वीच कुणकुण लागली होती असेही सांगितले जात आहे.
मतमोजणी झाल्यानंतर भाजपा पुरस्कृत महायुतीतील सर्व विजयी उमेदवारांनी लाल गुलाल लावत आणि मिठाई वाटत विजय साजरा केला. तर महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाच्या मिलिंद नार्वेकर यांनी आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी विजय साजरा केला.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत हे आवर्जून विधिमंडळात आले होते. यावेळी संजय राऊत आणि भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी जूना दोस्तीला जागत एकमेकांसोबत हास्यविनोद केले. तर अजित पवार आणि जयंत पाटील हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असूनही विधानसभेच्या लॉबीत हास्यविनोद करत राजकिय गप्पा मारत असल्याचे चित्रही विधिमंडळात आज पाह्यला मिळाले.
Marathi e-Batmya