शिंदे गट आणि शिवसेने दरम्यान मिरजेत बुलढाण्यासारखी घटना होता होता राहिली पोलिसांनी सामोपचाराने चर्चेतून काढला मार्ग

मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून प्रत्यक्ष संघर्ष टाळत फक्त एकमेकांवर टीकाच करत होते. मात्र आज बुलढाण्यात ठाकरे गटाच्या कार्यक्रमात शिंदे गटाचे कार्यकर्त्यांनी घुसून गोंधळ घालत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना जखमी केले. अगदी तशीच परिस्थिती आज संध्याकाळी मिरज येथे होता होता राहीली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सामोपचाराने मार्ग काढला. तसेच दोन्ही बाजूंनी दाखवलेल्या सामंजस्यामुळे हा प्रकार थोडक्यात निभावला आणि वादावर दोन्ही बाजूंना मान्य होणारा तोडगा निघू शकला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरजमध्ये शिंदेगट आणि शिवसेना या दोन्ही बाजूंनी स्वागत कमान आणि स्टेज उभारण्यासाठी एकाच जागेवर दावा केला होता. यासाठी पोलिसांकडे रितसर परवानगी पत्र देखील देण्यात आलं होतं. मात्र, एकाच जागेसाठी दोन्ही बाजू प्रयत्नशील असल्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यामुळे हा वाद वाढण्याचे देखील शक्यता निर्माण झाली होती.

हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मिरज नगरीमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनंत चतुर्थीच्या दिवशी मिरजमध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन मिरवणूक काढली जाते. अनेक राज्यांतून येणारे गणेश भक्त या मिरवणुकीत सहभागी होत असतात. विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत मिरजेत स्वागत कमानी उभारण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. विविध पक्ष आणि संघटनांकडून या कमानी उभारल्या जातात. यामध्ये शिवसेनेचा देखील समावेश असतो.

यंदा मात्र शिवसेनेत फूट पडून दोन गट तयार झाले. आणि दोन्ही गटांनी एकाच ठिकाणी स्वागत कमान आणि स्वागत स्टेजसाठी परवानगी मागितली. दोन्ही गटांनी एकाच जागेवर दावा केल्यामुळे वाद निर्माण झाला. सुरुवातीला पोलीस प्रशासनाने दोन्ही गटाला परवानगी नाकारली. मात्र सार्वजनिक उत्सव आणि कायदेशीर बाबी यांची सांगड घालत व्यावहारिकपणे पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढला.

पोलिसांनी या दोन्ही गटांसोबत बैठकीत चर्चा केली. त्यानंतर दोन्ही गटांनी आपापसात चर्चा करून स्वागत कमान आणि स्वागत स्टेजसाठी वेगवेगळ्या जागांची निवड केली. त्यामुळे स्वागत कमानीबाबतचा वाद मिटला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *