उध्दव ठाकरे म्हणाले, हस्तक्षेप असेल तर मुख्यमंत्री पदावर राहणे योग्य नाही उपमुख्यमंत्री म्हणतात तसे सोपे असेल तर न्यायालयात प्रलंबित का

मागील दोन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर सुधार न्यायाच्या भूखंड प्रकरणावरून विविध प्रसार माध्यमातून वृत्त प्रकाशित होत आहे. त्यातच तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्या निर्णयावरून न्यायालयाने ताशेरे ओढले. या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत तीव्र उमटले असून त्याचा परिणाम सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. या पार्श्वभूमीवर सध्या नागपूर दौऱ्यावर आलेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेत न्यायालयाचा हस्तक्षेप असेल तर पदावर राहणे योग्य नसल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदावर राहणे योग्य नसल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगत राजीनाम्याची मागणी केली.

आज सकाळी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील जनतेसमोर असणारे प्रश्न, समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर चर्चा झाली. विधानसभेत आमदारांच्या निधी वाटपात असमानता असल्याने आवाज उठवण्यात आला. सरकारने समतोल राखू असं म्हटलं आहे. आमदार हे कोणत्या पक्षाचे आहेत हे महत्त्वाचं नसून, ते महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या विभागातील कामं जनतेची असतात, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, नागपूर खंडपीठाने दिलेला स्थगिती आदेश गंभीर आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जुना विषय इतका सोपा असेल तर इतकी वर्ष न्यायालयात का होता? स्थगिती का देण्यात आली आहे? स्थगिती देताना हे प्रकरण न्यायप्रविष्ट विषय असताना सरकारने यामध्ये हस्तक्षेप केल्याचे सांगितले आहे. याला आमचा विरोध आहे. ज्या खात्याचा निर्णय आहे त्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सरकारकडून बाजू मांडली जाणार असेल तर त्यात हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण निर्णय घेणारे तेच आहेत.

आरोप झाल्यावर याआधीही मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. यंत्रणेवर अवाजवी दवाब असता कामा नये. कायद्यानुसार झालं असेल तर न्यायालयाने स्थगिती का दिली हे महत्त्वाचं आहे. जेव्हा न्यायालय हस्तक्षेप झाल्याचं सांगतं तेव्हा ही बाब गंभीर आहे. त्यामुळे जोपर्यंत निकाल लागत नाही तोवर त्या व्यक्तीने पदावर राहणं योग्य नाही, अशी मागणीही त्यांनी केली.

जेलमध्ये असणाऱ्या मंत्र्यांचा तेव्हा राजीनामा मागितला नाही, मग आता माझा राजीनामा का मागताय? अशी विचारणा एकनाथ शिंदेंनी केली. त्यावर ते म्हणाले, त्यांना जेलमध्ये तरी टाकलं ना. त्यांना जेलमध्ये टाकणाऱ्यांना हे चालतं का विचारा. चोरी केली असेल तर मग कोणीही केली तरी ती चोरीच आहे. गुंतागुंत करण्यापेक्षा मुद्द्याचं बोलावं. आक्षेप आम्ही नाही तर न्यायालयाने घेतला आहे. अशी उत्तरं देऊन तुम्ही वेळ मारुन नेऊ शकत नाही असेही ते म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर समाधान की असमाधान असा प्रश्न नाही. या निवडणुकीचं वातावरण वेगळं असतं. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या असतात तर काही ठिकाणी गावकरी एकत्र येऊन निवडणुका लढवत असतात. त्यामुळे हे कोणत्याही एका पक्षाचं यश, अपयश नाही. पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक असं काही नसतं. वर्षानुवर्षं आपण हे आकडे ऐकत आहोत. याच्यात फोलपणा किती हे कालांतराने कळतं. आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा म्हणणं बालिशपणा आहे, अशी टीकाही त्यांनी भाजपाचे नाव न घेता केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *