कधी काळी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता मला रात्रीची झोप सुखाने लागते म्हणणारे इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी आज जवळपास १० वर्षांनंतर भाजपा सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पक्षाची तुतारी हाती घेतल्याचे यावेळी जाहिर केले.
तसेच यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे या आमच्या भगिनी, त्या चार वेळा खासदार म्हणून निवडूण आलेल्या आहेत. त्यापैकी तीन वेळा त्यांना निवडूण आणण्यात मी सोबत होतो. आता चवथ्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडूण आणताना माझा अदृश्य हात त्यांच्यासोबत होता असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा उसळला.
इंदापूर येथील मार्केट कमिटीच्या मोकळ्या जागेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचा सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या गळ्यात तुतारी असलेले पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे हर्षवर्धन पाटील यांच्या गळ्यात घालत त्यांना पक्षात प्रवेश दिला.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत करताना जयंत पाटील म्हणाले की, तुम्ही इंदापूरकर आमच्यापेक्षा अधिक अॅ़डव्हॉन्स आहात. त्यामुळे मी तुम्हाला सांगलीच्या वाळव्यातून येत काय सांगणार असे सूचक वक्तव्य करत हर्षवर्धन पाटील यांनी आता स्थानिक जनतेची जनभावना ओळखून तुतारी हाती घेतली आहे. मात्र महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे जागा वाटप झाल्याशिवाय कोणत्याही पक्षाने उमेदवार आणि जागा जाहिर करायची नाही असा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. परंतु तुम्ही इंदापूरकर सर्व आमच्यापेक्षा पुढे असल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करणार नाही. परंतु इतकेच सांगतो की, हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी आहे असे सूचक शब्दात सांगत अप्रत्यक्ष इंदापूरचे पुढील उमेदवार हर्षवर्धन पाटील हेच असतील असे जाहिर केले.
Marathi e-Batmya