हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना एकरी २० हजार अनुदान द्या खरिपासाठी शेतक-यांना मोफत बियाणे व खते द्या!

राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी २० हजार रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बळीराजा संकटात आल्यास त्याला तातडीने मदत करण्याचे काम काँग्रेसचे सरकार असताना अनेकदा केले आहे. पिकावर रोग पडला, लाल्या पडल्या, गारपीट झाली, अवकाळी पावसाने नुकसान झाले की सरकारने कशाचीही पर्वा न करता शेतकऱ्याला मदत दिली. आताचे सरकार मात्र शेतकऱ्याला मदत करण्याच्या विचाराचे नाही. केवळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन, कोरडी आश्वासने देऊन चालणार नाही, शेतक-यांना तातडीने मदत पोहचवली पाहिजे. खरिप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफी अद्याप जाहीर केलेली नाही, कर्जाचे पुनर्गठन तरी करून द्यावे. सरकारचे खरिपाचे काहीच नियोजन नाही याकडेही लक्ष वेधून अडचणीत आलेल्या शेतक-यांना खरीप हंगामासाठी मोफत बियाणे व खते द्यावीत, अशी मागणीही यावेळी केली.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुसळधार पावसाने भाजपा युती सरकारचे सर्व दावे फोल ठरले आहेत. कालवे फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार तसेच मुंबई तुंबल्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी बाहेर पडली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईत जागोजागी पाणी साचले, सर्व व्यवस्था कोलमडली. भुयारी मेट्रो मुंबईत शक्य नसल्याचा एमएमआरडीएचा अहवाल असतानाही काही लोकांच्या हट्टासाठी हा प्रकल्प राबविला त्याचे परिणाम आज दिसत आहेत. रात्रीच्या अंधारात हजारो वृक्षांची कत्तल करून मेट्रोचा अट्टाहास पूर्ण केला. सत्ताधारी पक्षाचा कथित विकास एका पावसानेच उघडा पाडल्यानंतरही हे लोक आधीच्या सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. २५ वर्ष भाजपा शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत सत्तेत होती, एकनाथ शिंदे सातत्याने नगर विकास खात्याचे मंत्री आहेत, मग याकाळात भाजपा व एकनाथ शिंदे यांनी काय केले, असा सवाल उपस्थित करत सरकारने आरोप प्रत्यारोपाचा खेळ सोडून आत्मपरिक्षण करावे आणि जनतेला मदत करावी असेही यावेळी सांगितले.

हर्षवर्धन सपकाळ यांनी अमित शाह यांच्यावर टीका करताना म्हणाले की, महाराष्ट्र नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना राज्याचे मंत्रिमंडळ मात्र अमित शाह यांची खुशामत करण्यात मग्न आहे. आपले मंत्रीपद शाबूत रहावे यासाठी मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री धडपड करत आहेत. अमित शाह यांनी निवडणुकीच्या प्रचारात दोन सिलिंडर मोफत देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणार, अशा वल्गणा केल्या, त्याचा आता त्यांना विसर पडलेला दिसत आहे. अमित शाह महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटावर एक शब्दही बोलले नाहीत. आता दिल्लीला जाण्यापूर्वी तरी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून जावी. कारण राज्यातील सरकार अमित शाह यांच्या शब्दाशिवाय कामच करत नाही असा उपरोधिक टोलाही यावेळी भाजपाला लगावला.

या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी व प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *