नाना पटोले यांची टीका,…. फरकही पंतप्रधानांना कळू नये हे देशाचे दुर्भाग्य बजरंग बलीच्या आड लपून भाजपला ४० टक्के कमीशनचे पाप झाकता येणार नाही

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. कधी रामाच्या नावावर तर कधी बजरंग बलीच्या नावावर ते मतं मागत आहेत परंतु देव आणि देवाच्या नावावर समाजामध्ये तेढ निर्माण करणा-या संघटना यातील फरक पंतप्रधानांना कळत नाही हे देशाचे दुर्भाग्य असल्याचे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, बजरंगबलीचे भक्त आम्हीही आहोत, त्याची उपासनाही करतो पण त्याचा सार्वजनिक दिखावा करत नाही. धर्माच्या नावाने जनतेला लुटणाऱ्या संघटना नसाव्यात परंतु काही लोक धर्माच्या नावाने लुटत आहेत. देवाच्या नावाने लुटपाट करणारी व्यवस्था कोणत्याही धर्मात असेल तर त्या व्यवस्थेत बदल झाला पाहिजे तरच लोकांचा धर्मावरचा विश्वास वाढेल. भाजपाकडे जनतेला सांगण्यासारखे काही नाही म्हणून ते नेहमीप्रमाणे धर्माच्या नावावर फुट पाडून मतं मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत परंतु कर्नाटकची जनता भाजपाचा हा कुटील हेतू समजते.

बजरंग दलावर बंदी घातल्यास बजरंग बलीचा अपमान होतो हा भाजपाचा आरोप धादांत खोटा आहे. भाजपाला राम, हनुमान किंवा कोणत्याही देवाबद्दल प्रेम नाही, भाजपा देवाचा व धर्माचा फक्त सत्तेसाठी वापर करतो. बजरंग दलाच्यावरुन आरडाओरड करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मनोहर पर्रिकर सरकारनेच गोव्यात श्रीराम सेनेवर बंदी घातली होती, त्यावेळी रामाचा अपमान झाला असे वाटले नाही का? त्यामुळे भाजपासाठी देव हे फक्त मतांचा जोगवा मागण्यासाठीच आहेत त्यांचे हे ढोंग जनतेला माहित आहे, भाजपाच्या या कांगाव्याला कोणी फसणार नाही.

उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील अंगोला येथील प्रचारादरम्यान भाजपा पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गणपतीची मूर्ती भेट देत असताना मोदींनी गणपती मूर्ती हाताने बाजूला करत त्या कार्यकर्त्यालाही बाजूला सारून गणपतीचा अपमान केला, त्यावर भाजपा नेते का बोलत नाहीत? एकीकडे गणपतीचा अपमान करायचा व दुसरीकडे बजरंगबलीच्या नावाने गळे काढायचे हे भाजपाचे दुटप्पी धोरण नाही का? गणपतीचा अपमान केल्याबद्दल भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त हिंदूंची जाहीर माफी मागितली पाहिजे.

मी पुन्हा येईन..

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, मी पुन्हा येईन म्हणालो होतो तसा पुन्हा आलो आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत पण पुन्हा आल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्रपदावर आले, माझ्यासारखा असता तर खालच्या पदावर आलाच नसता असा टोला मारत कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर येणार की नाही याची चिंता करण्याऐवजी फडणवीसांनी भाजपा कर्नाटकात सत्तेत येईल का? याची जास्त चिंता करावी, असेही पटोले म्हणाले.

About Editor

Check Also

रमेश चेन्नीथला यांचा इशारा, शेतकरी, बेरोजगार, महिला, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून लोकशाहीची हत्या, विपरित परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते निर्धाराने लढले

काँग्रेस पक्ष राज्यात आगामी वर्ष संघटन बांधणीवर भर देत गावपातळीपर्यंत नियुक्त्या करण्याबरोबर सेल, विभाग, सेवादलही मजबूत करणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *