राज्यभरात परतीच्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेण्याचा धडाका लावला होता त्यात एखादा निर्णय माझ्या शेतकऱ्यांबाबत घेतला असता तर आज कदाचित परिस्थिती वेगळी असती अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून प्रतिक्रिया दिली आहे त्यात ते म्हणतात परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कापूस, मका, सोयाबीन आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दिवाळी तोंडावर आहे अशात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आधीच या सरकारने काही ठराविक उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी सोयाबीन व तेल बिया यांसारख्या पिकांच्या आयातीला परवानगी दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे आधीच मोठे नुकसान झाले होते. आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर घातली. या दुहेरी संकटातून सावरण्यासाठी सरकारने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करावे व तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी असल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी जयंत पाटील म्हणाले की, निवडणुका तोंडावर आल्याने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घेण्याचा जो धडाका सरकारने लावला होता. त्यात एखादा निर्णय माझ्या शेतकऱ्यांबाबत घेतला असता तर आज कदाचित परिस्थिती वेगळी असती अशी खंतही यावेळी व्यक्त केली.
Marathi e-Batmya