Breaking News

जयंत पाटील यांची माहिती, …राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्यांना संधी अजित पवार गटाच्या आमदारांबाबत मौन

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जे उमेदवार दिले त्यात इथे बसलेले डॉ अमोल कोल्हे सोडले तर उर्वरित सर्व खासदार हे पहिल्यांदा लोकसभेत जाणार आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून नव्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे दिली.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेत राज्य सरकारच्या विरोधात रोष दिला. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसेल, असा विश्वासही व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक आज प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह डॉ. अमोल कोल्हे, अमर काळे, बजरंग सोनावणे, बाळ्यामामा म्हात्रे, धैर्यशील मोहिते- पाटील,भास्कर भगरे, उपस्थित होते. सुप्रिया सुळे आणि निलेश लंके हे नियोजित कार्यक्रम असल्याने येऊ शकले नाहीत. या बैकठीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे स्पष्ट संकेत दिले.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांच्या पक्षाचे १८ ते १९ आमदार पुन्हा शरद पवार गटात परतणार असल्याची चर्चा असल्याबाबत विचारले असता, जयंत पाटील यांनी या प्रश्नावर बोलण्याचे टाळले. काही आमदार रोहित पवार यांच्या संपर्कात असतील. मात्र, मी या विषयावर योग्य वेळी बोलेन असे सांगत आमदार गेल्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ झाला आहे. त्यामुळे परत येऊ इच्छिणाऱ्या आमदारांबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे पक्षाला फटका बसला. पिपाणी चिन्हाला सरासरी ४५ ते ५० हजार मतदान झाले आहे. एकट्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पिपाणी चिन्हाला १ लाख ३ हजार मते मिळाली. तर सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा आम्ही ३२ हजार मतांनी गमावली. सातारा मतदारसंघात पिपाणी चिन्हाला ३७ हजार मते मिळाली आहेत. पिपाणीचा प्रचार तुतारी असा केला गेल्याने आम्हाला फटका बसला. त्यामुळे पिपाणी चिन्हाविषयी निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचेही यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय विस्तारित कार्यकारिणीची बैठक येत्या ९ जून रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होणार आहे. तर १० जून हा पक्षाचा स्थापना दिन यावर्षी अहमदनगर शहरात साजरा केला जाणार असल्याचेही यावेळी या सांगत वर्धानपदिनाच्या निमित्ताने अहमदनगर शहरात पक्षाची सभा जाहीरसभा होणार असल्याचेही यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *