जयंत पाटील यांचा सवाल, होत्याचं नव्हतं झालं तर येणा-या पिढीला आपण काय उत्तर देणार? महाराष्ट्र दिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य़क्ष जयंत पाटील यांचं भावनिक पत्र

सध्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येतील का याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक भावनिक पत्र प्रसिद्ध केले. त्यात जयंत पाटील म्हणाले की, मुंबई, महाराष्ट्र, माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.

जयंत पाटील यांचे सविस्तर पत्र असे,

माझ्या प्रिय महाराष्ट्र वासियांनो,

आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन! भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिती केली जात होती. परंतु भारत सरकारने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरून मराठी-जनात क्षोभ उसळला. यातून प्रचंड तीव्र आंदोलन आणि मोठा लढा उभा झाला, शेवटी १९६० साली स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला.

स्व. यशवंतराव चव्हाण म्हणाले त्याप्रमाणे हा ‘सोनियाचा दिवस’ आपल्याला सहज मिळाला नाही, तर त्यासाठी तब्बल १०६ हुतात्मांनी आपले बलिदान दिले. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर २१ नोव्हेंबर १९५६ साली झालेल्या मोर्चाचे देता येईल. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला. या निर्णयाचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात आला. तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा विरोध करण्यासाठी कामगारांचा विशाल मोर्चा फ्लोअरा फाऊंटन येथे पोहोचला. जमावबंदी, पोलिसांचा लाठीचार्ज अशा कोणत्याही कारवाईने मोर्चा आटोक्यात आला नाही. म्हणून शेवटी मोर्चा चिरडण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले आणि अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले. हे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, मुंबई, महाराष्ट्र आणि माय मराठीसाठी तिच्या लेकरांनी प्राणांची आहुती दिली तेव्हा मराठी देश स्थैर्य प्राप्त करू शकला आहे.

यंदा महाराष्ट्र राज्य आपला ६५वा स्थापना दिन साजरा करत आहे. गेल्या ६५ वर्षात महाराष्ट्राने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, औधोगिक, शैक्षणिक या सर्व स्तरांत उत्तुंग कामगिरी केली. पण मधल्या काळात महाराष्ट्राची प्रचंड पिछेहाट झाली आहे. दिवसाढवळ्या महिलांच्या अब्रूवर हात टाकला जात आहे, पाण्यासाठी लोकांना जीव गमवावा लागत आहे, शेतकरी हवालदिल होऊन आपले प्राण त्यागत आहे, राज्यकर्त्यांच्या मानगुटीवर ‘हिंदी’चे भूत बसले असल्याने आपल्याच घरात ‘मराठी’ हाल सोसत आहे. आपलेच परक्यांसोबत बसून महाराष्ट्राच्या वाटाघाटी करत असतील तर दुसरे काय होणार?

आता हे कुठपर्यंत सहन करायचे? यासाठीच मराठी माणसांनी हौतात्म्य पत्करले होते का? होत्याचं नव्हतं झालं तर येणा-या पिढीला आपण काय उत्तर देणार? मुंबई, महाराष्ट्र, माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.

दरम्यान जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले असताना राज्याच्या राजकारणात आणखी काही घडामोडी घडतील का ? हा प्रश्न पुन्हा यानिमित्ताने पुढे आला आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट विभागांचा गौरव कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर विभागांनी काम करावे

राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *