गुढी पाडव्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे राज्याला पत्र !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने राज्यातील जनतेला पत्र लिहिले आहे. आपल्या राज्यातील संस्कृती, महापुरुषांचे योगदान या सर्व गोष्टींवर जयंत पाटील यांनी प्रकाश टाकला आहे. तसेच राज्याच्या सुरु असलेल्या अधोगतीकडेही त्यांनी या पत्राद्वारे सामान्य जनतेचे लक्ष वेधले आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पत्र जसेच्या तसे

नमस्कार,
आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व बंधू-भगिनींना सर्वप्रथम गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

अनेक महापुरुषांचा वारसा असणारे आपले महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंकृत राज्य आहे. या राज्यात आपण जन्म‌लो हे आपले भाग्य. अठरापगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. संतांच्या वाणीने पावन झालेल्या भूमित जसे महाकाय सह्याद्री आणि विशाल अरबी समुद्र एकत्र नांदले. तसेच अनेक धर्म, भाषा, साहित्य, संस्कृती एकत्र नांदल्या आणि भरभराटीस आल्या.

येथे राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वीरतेची कथा लिहिली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री-पुरुष समानतेची तोरणे बांधली. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्रीयांचा मळवट शिक्षणाने भरला. छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील विषमतेच्या रेखा पुसट केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर स्वातंत्र्यानंतर घटनेतच समानतेचा अधिकार दिला. हा सर्वसमावेशक समृद्ध वारसा पुढे नेणारे महाराष्ट्र संपूर्ण देशासाठी दिशादर्शक राज्य ठरले.
मात्र आज परिस्थिती बदलली आहे. तत्वांशी तडजोड करत, नितीमत्तेची चाळण करणारे समाजभेदी विचार डोकं वर काढते आहे. राजकीय परंपरेत गुंडांचा शिरकाव झाला आहे. सातत्याने होणाऱ्या गुन्हांच्या शृंखलेत राज्य बिथरले आहे. कृषी संस्कृती आपल्या छातीवर मिरवणारी ही काळी माती संकटात आहे. माझा शेतकरी बांधव हतबल आहे. राज्याचे भविष्य साकारणारा तरुण स्वतःच्याच भविष्याबद्दल अनभिज्ञ आहे. स्वार्थाच्या बाजारात तत्वे, निष्ठा विक्रीस काढण्यात आली आहेत. या नकारात्मकतेवर मात करायची असेल तर परिवरर्तनाची वाट धरावी लागेल. येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत आपल्या एका मताने परिवर्तनाची तुतारी संपूर्ण महाराष्ट्रात निनादू शकते.

त्यामुळे यंदाच्या पाडव्यासाठी निष्ठेच्या काठीला पुरोगामी विचारांचे वस्त्र बांधूयात. तत्व, नीतिमत्ता यांची हार-फुले चाढवूयात. कडुलिंबाप्रमाणे सत्य कितीही कटू असले तरी त्याच्याच माळा लावूयात. महाराष्ट्राच्या अस्मितेचा लखलखीत कलश त्यावर ठेवून लोकशाहीची गुढी सदैव उंच राहील याची प्रतिज्ञा करूयात.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्याने शेतमालाचे भाव पडले सरकारकडे पैसे नसताना ८८ हजार कोटी रुपयांच्या महामार्गाची गरजच काय?

अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *