एका महिलेला अर्धनग्न फोटो पाठविल्याप्रकरणी आणि त्याच महिलेला अटक करायला भाग पाडत, पत्रकार तुषार खरात याच्यासह राष्ट्रवादीचे रोहित पवार, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत याच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव भाजपाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांनी दाखल केला. त्यापार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेले भाजपाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवत, मी मंत्री झालो, पण हे शरद पवार यांना अद्याप मान्य होत नाही पण मी शरद पवार यांच्यासमोर कधीही झुकणार नाही असे सांगितले.
मंत्री जयकुमार गोरे हे माण-खटाव येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की, ज्या लोकांवर माझ्या माण-खटावच्या मातीने जिल्ह्याने प्रेम केलं. त्या लोकांच्या विरोधात सर्वात आधी बारामतीच्या लोकांना सर्वात आधी कळ लागली की, हा सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे, साधा माणूस आमदार कसा होऊ शकतो, मी आमदार झाल्याचं १० वर्षे मान्य केलं नाही. आता आमदार झालो हे मान्य पण मंत्री झालो हे मान्य नाही. आतापर्यंत सर्व नेत्यांनी तडजोड केली असेल पण पश्चिम महाराष्ट्रातील मी एकमेव व्यक्त आहे कधीही पवारांच्या पुढे झुकलो नाही आणि कधी झुकणार नाही माझं राजकारण संपलं तरी चालेल असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.
शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करताना जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, बारामतीच्या पुढे कधीही झुकलो नाही, बारामतीच्या पुढे झुकलो असतो तर माझी आमदारकी सोपी झाली असती. मात्र आपल्या शेतात पाणी आलं नसतं. मी त्यांची गुलामगिरी स्विकारली असती तर माण खटावच्या शेतात पाणी आलं नसतं. आज माण खटावच्या मातीत जी काही विकासाची गंगा वाहते, ती कधीही वाहिली नसती. बारामतीच्या दारात जाऊन बसण्याशिवाय माझ्या हातात काही राहिलं नसतं, मी एकमेव व्यक्ती आहे कधीही बारामतीची पायरी चढलो नाही असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की, बारामतीला माझा विरोध नाही. माझा विरोध ज्यानी या माण खटावला पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांना माझा विरोध आहे. माझी लढाई ही माझ्या मातीच्या स्वाभिमानासाठी आहे. माझा विरोध बारामती किंवा पवारांना नाही अशी शेवटी सारवासारवही केली.
Marathi e-Batmya