Breaking News

कर्नाटकात आकड्यांच्या खेळातील अतिविश्वास भाजपला नडला येदीयुरूप्पा यांचा दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

बंगरूळू-मुंबई : प्रतिनिधी

नुकत्यात झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत कर्नाटकी जनतेने सत्तेचा सोपान कोणत्याही पक्षाच्या हाती न देता ती त्रिशंकु अवस्थेत ठेवली. तरीही भाजप नेते येदीयुरप्पा यांनी सत्तेच्या सारीपटावरील आकड्यांचा खेळ जिंकण्यासाठी अतिविश्वास दाखवित सरकार स्थापनेसाठी दावा केला. त्यासाठी राज्यपाल वजूभाई वाला यांनी पूरक भूमिकाही घेतली. मात्र सत्तेच्या सारीपटावरील आकड्यांचा खेळ भाजपला जिंकता आला नसल्याने दोनच दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचे येदीयुरप्पा यांनी विधानसभेत विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जाण्या आधीच जाहीर करत या खेळात पराभव झाल्याचे स्पष्ट केले.

निवडणूकीच्या निकाल जाहीर होत असताना निकालाच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपने ११० जागांवर आघाडी घेण्यास सुरुवात केली. तसेच भाजपला एकहाती सत्ता मिळणार असल्याचे अंदाज मांडायला सुरुवात झाली. मात्र निकालाच्या तिसऱ्या सत्रात चित्र पुन्हा पालटण्यास सुरुवात झाली आणि ११० जागांच्याही पुढे गेलेली भाजप पुन्हा १०० आकड्याच्या संख्येकडे यायला सुरुवात झाली आणि १०४ जागांवर भाजपची अखेर विजयी घोडदौड थांबली. तर काँग्रेसने ७८ जागांवर विजयी झाली. यात कोणाच्याही ध्यानीमनी नसलेले एच.डी.देवेगौडा यांच्या जनता दल (यु) ला ३८ जागा मिळत महत्वाची भूमिका करण्याची नामी संधी मिळाली.

परंतु, राज्यात १११ या जादूई संख्येचा आकडा गाठायचा आणि काहीही करून सत्ता स्थापन करायचीच या उद्देशाने भाजपने गोवा, मेघालय राज्यात अवलंबलेल्या फार्म्युल्याचा वापर करण्याचे  भाजपने ठरले. त्यानुसार काँग्रेस, जनता दल आणि इतर २ आमदारांचा पाठिंबा मिळविण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली. भाजपला सत्तेच्या सोपानापासून रोखण्यासाठी आणि स्वपक्षीय सदस्यांना रोखण्यासाठी  काँग्रेसने राजकिय शहाणपण दाखवित या सर्व आमदारांना एकत्रित करून त्यांना पहिल्यांदा कर्नाटकबाहेर हलविले. तसेच राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपला पहिली संधी देत १५ दिवसांची संधी देत एकप्रकारे घोडेबाजाराला मोकळे रान दिले. त्यामुळे राज्यपालांच्या या भूमिकेच्या विरोधात काँग्रेसने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत राज्यपालांचा निर्णयच फिरविला.

तरीही भाजपच्या धुरीणांकडून काँग्रेस आणि जदयुच्या आमदारांशी संपर्क साधून मोठमोठ्या किंमतीच्या ऑफर देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे काँग्रेसच्या आमदारांशी थेट संपर्क होत नव्हता तर भाजपकडून त्या आमदारांच्या पत्नीला, कुटुंबियांशी संपर्क साधून कोट्यावधी रूपयांची आमिषे दाखविली. मात्र काँग्रेसनेही खबरदारीचा उपाय म्हणून कोणत्याही आमदाराला त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधू दिला नाही. त्यामुळे भाजपची आर्थिक आमिषाच्या बळावर आकड्यांचा खेळ जिंकता येणार नसल्याचे कालच शपथविधी घेतल्यानंतर स्पष्ट झाले होते. तरीही भाजपकडून शेवटच्या क्षणापर्यंत आकड्यांचा खेळ जमविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत होते. परंतु अखेर भाजपला खेळ काही केल्या जिंकता आला नसल्याने हाती घेतलेला सत्तेचा सोपान दोनच दिवसात खाली ठेवण्याची पाळी आली. यातला भाजपचा अतिविश्वास नडल्याचे चित्र राजकिय क्षेत्रात निर्माण झाले.

Check Also

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी उमेदवारांना मोफत प्रशिक्षण रोजगाराभिमुख मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश सुरु

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे आणि MSME टेक्नॉलॉजी सेंटर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *