केशव उपाध्ये यांची टीका, काँग्रेसच्या ‘हिंदू दहशतवादा’ च्या फेक नॅरेटिव्ह’ला एनआयएची चपराक मालेगाव बॉम्बस्फोट निर्णयाचे भाजपाकडून स्वागत

‘भगवा आतंकवाद’ आणि ‘हिंदू दहशतवाद’ नावाचा फेक नॅरेटिव्ह तयार करून हिंदू समाजाबद्दल विष पेरण्याच्या प्रयत्नास एनआयए न्यायालयाने दिलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाने काँग्रेसला सणसणीत चपराक बसली आहे. या खटल्यात सात हिंदू राष्ट्रवाद्यांना आरोपी ठरवून अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन करण्याचा काँग्रेसचा कट उधळला गेला असून, हिंदू कधीच दहशतवादी असू शकत नाही ही बाब या निकालातून स्पष्ट झाली आहे. या खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करून न्यायालयाने न्यायाची बाजू भक्कम केली आहे, अशी भावना भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी व्यक्त केली.

केशव उपाध्ये पुढे बोलताना म्हणाले की, तब्बल १७ वर्षांपूर्वीच्या या घटनेत साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी व सुधाकर द्विवेदी यांना गुन्हेगार ठरवून काँग्रेस शासनाने त्यांचा अमानुष छळ केला. हिंदू दहशतवादाचा फेक नॅरेटिव्ह लोकांना पटावा याकरिता या आरोपींकडून गुन्हा कबूल करवून घेण्यासाठी अनन्वित अत्याचार केले. हिंदू समाजाला बदनाम करण्याचा व त्याद्वारे अल्पसंख्याक समाजाला कुरवाळून राजकीय लाभ उठविण्याचा हा व्यापक कट होता हे आता सिद्ध झाले आहे, असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, हिंदू दहशतवाद हा शब्द वापरून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीर क्षमायाचना केली होती, तरीही कॉंग्रेसने हा शब्द रुजविण्यासाठी जंग जंग पछाडले. या मानसिकतेतूनच संसदेतील चर्चेत काँग्रेसी विचारांचा वारसा घेतलेल्या प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर हा तमाशा असल्याचे उद्गार काढून पाक हल्लेखोरांनी हत्या केलेल्या निरपराधांचा व देशाच्या भावनांचा अपमान केला, पाकिस्तानला क्लीन चिट देण्यासाठी राहुल गांधींसह सर्व कॉंग्रेसींनी केविलवाणी धडपड केली, असा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांना आव्हान देत पाकिस्तान व चीनच्या भीतीचे भूत देशासमोर उभे करणाऱ्या राहुल गांधींच्या काँग्रेसमुळेच पाकव्याप्त काश्मीर निर्माण झाला, १९७१च्या युद्धातील हजारो पाक युद्धबंदींना परत पाठविले गेले आणि त्यावेळी भारताने ताब्यात घेतलेला हजारो चौरस किलोमीटरचा भूभाग पाकिस्तानला बहाल केला गेला. इतकेच नव्हे तर पाकिस्तानला युद्ध थांबविण्यास भाग पाडावे यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना पत्र पाठवून गयावया केली होती. काँग्रेसने तेव्हाच कणखर भूमिका घेतली असती तर पाकिस्तानी दहशतवादाचे भूत तेव्हाच गाडले गेले असते, अशी टीकाही यावेळी केली.

शेवटी बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, मालेगाव खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता हा काँग्रेसच्या हिंदूविरोधी व पाकधार्जिण्या राजकारणास मिळालेला धडा आहे. काँग्रेसने हिंदूद्वेषाचे राजकारण थांबवून अल्पसंख्याकांच्या भावना कुरवाळणे थांबविले नाही तर देशातील हिंदू समाज काँग्रेसला माफ करणार नाही, असा इशारा देत  दहशतवादाला धर्म नसतो, पण जेव्हा जेव्हा देशात विध्वंसक दहशतवादी कारवाया घडल्या, तेव्हा त्यामागे पाकिस्तानातील मुस्लिम दहशतवाद्यांचा हात होता हे स्पष्ट झाले असल्याचा दावाही यावेळी केला.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, बिनशेती झालेल्या मिळकतींवर अकृषिक कर रद्द विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

राज्यातील बिनशेती झालेल्या मिळकतींवर दरवर्षी आकारला जाणारा अकृषिक कर आकारण्यात येऊ नये, असा निर्णय १० फेब्रुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *