केशव उपाध्ये यांचा आरोप, राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह मतचोरीच्या खोट्या आरोपांबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी

उठसूठ मतचोरीचा डांगोरा पिटणारे राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह आहेत. गवगवा करून पत्रकार परिषदा घ्यायच्या, व्हिडिओ सादरीकरण करायचे, काँग्रेसच्या इको सिस्टिमने मतचोरीचा खोटा मुद्दा उचलून धरायचा आणि कोणताही पुरावा सादर न करता केवळ हवा निर्माण करायची हा सध्या काँग्रेसचा धंदा झाला आहे. मतचोरीचा खोटा आरोप करण्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी. मतमोजणी, मतदारयादी याबाबत काही आक्षेप असतील तर निवडणूक आयोगाकडे  प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे अशी मागणी भाजपार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

यावेळी केशव उपाध्ये यांनी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे याबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारायचे धाडस दाखवणार का असा सवालही त्यांनी उबाठांना केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कर्नाटक उच्च न्यायालयाने काँग्रेस आमदाराची आमदारकी रद्द करून मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश देऊन काँग्रेसचे मतचोरीचे पितळ उघडे पाडले असा घणाघातही केला.

केशव उपाध्ये यांनी यावेळी अनेक उदाहरणे पत्रकारांसमोर ठेवत मतचोरीचा डांगोरा पिटणा-या काँग्रेसचा मतचोरीचा पूर्वइतिहास विशद करून सांगितला. महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड  मतदारसंघात त्यांच्या नातेवाईकांच्या एकाच घरात मतदार म्हणून अनेक नावे नोंदली गेली. हेच पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या मतदारयादी निरिक्षणाचे प्रमुख आहेत हे हास्यास्पद आहे. विशेष म्हणजे असे आरोप झाल्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याबद्दल ब्र देखील काढलेला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा व त्यांच्या पत्नीची वेगवेगळ्या मतदारसंघात २-२निवडणूक ओळखपत्रे सापडली होती याचीही आठवणही करून दिली. काँग्रेस पक्षातर्फेच मतचोरी केल्याची ही आणि अशी अनेक उदाहरणे असल्याने काँग्रेसचा मतचोरीचा पूर्वइतिहास असून आत्ताचा राहुल गांधी यांचा मतचोरीबद्दल चा कांगावा तद्दन खोटा असल्याची टीका केली.

केशव उपाध्ये यांनी सांगितले की, मतचोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना कायदेशीर लढाई लढायचीच नाही कारण त्यासाठी पुरावे लागतात ते त्यांच्याकडे नाहीत हे खुद्द राहुल यांनाही माहिती आहे. म्हणूनच  राहुल गांधी आणि काँग्रेसला केवळ मतचोरी झाली असा कांगावा करत देशभर राळ उडवून द्यायची आहे. अराजक पसरवायचे आहे. राहुल यांच्या बिनबुडाच्या मतचोरीच्या आरोपांची री ओढत चक्क नक्षलवाद्यांकडून ११ पानी पत्रक काढले जाते यावरून काँग्रेसचा डाव किती घातक आहे याची कल्पना येते असेही नमूद केले.

केशव उपाध्ये पुढे म्हणाले की, निवडणूक निकालावर आक्षेप असेल तर न्यायालयाच्या कसोटीवर उतरणारी कायदेशीर लढाई कशी लढायची आणि न्याय कसा मिळवायचा याचे उदाहरण म्हणजे कर्नाटकमधील मालूर मतदारसंघातील भाजपाचे के. एस. मंजुनाथ गौडा आहेत. त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करत काँग्रेस आमदार के.वाय.नंजेगौडा यांच्या आमदारकीला आव्हान दिले होते. कालच उच्च न्यायलयाने निकाल देत श्री. नंजेगौडा यांची निवड अवैध घोषित करत २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतील मतांची मतमोजणी पुन्हा करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या निकालाने काँग्रेसचे मतचोरीचे आरोप त्यांच्यावरच बूमरँग झाले अशी टीकाही केली.

शेवटी बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, एकीकडे मतचोरीचा डांगोरा पिटत अराजक पसरवायचे आणि दुसरीकडे बिहार मतदारयादी पुनर्निरिक्षणाला विरोध करायचा अशी दुटप्पी भूमिका काँग्रेसची आहे. मतदारयादी पुनर्निरिक्षणानंतर १ ऑगस्टला प्रकाशित करून त्यावर आक्षेप असल्यास एक आठवड्यात तक्रार करा असे जाहीरपणे आयोगाने सांगून देखील काँग्रेसकडून एकही आक्षेप घेतला गेला नाही. म्हणजे कायदेशीर कार्यवाही करायची नाही आणि प्रसारमाध्यमांमध्ये खोटे पुराव्याविना आरोप करून संशय निर्माण करण्याचा हा कुटील डाव आहे असा हल्लाबोलही केला.

 

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *