केशव उपाध्ये यांचा सवाल. हिंदूंना बदनाम करण्याच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ? पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाडांवरून केला सवाल

भगवा दहशतवादाच्या फेक नॅरेटिव्हचा कट कोर्टानेच उधळून लावल्यानंतर आता काँग्रेसी संस्कृतीने सनातन हिंदू धर्माच्या नावाने पुन्हा सुरू केलेला अपप्रचार म्हणजे महात्मा गांधींचा वारसा स्वतःच्या हाताने पुसून टाकण्याची तयारी असून, हिंदुत्वाचे मुखवटे धारण केलेल्या काँग्रेसच्या ताटाखालच्या मांजरांनी सनातन धर्मास दहशतवादी ठरविण्याच्या कटात सहभागी होऊन आपलाही मुखवटा उतरविल्याचे स्पष्ट झाले असल्याची टीका  प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.

हिंदूंना बदनाम करण्याच्या आ. जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे सहमत आहेत का असा सवाल ही केशव उपाध्ये यांनी यावेळी केला.

केशव उपाध्ये पुढे बोलताना म्हणाले की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना दोषी ठरवून भगवा आतंकवाद सिद्ध करण्याचा काँग्रेस नेत्यांचा व शरद पवार यांचा कट न्यायालयाने उधळून लावल्याने आता आमदार जितेंद्र आव्हाड नावाच्या आमदारास पुढे करून सनातनी दहशतवादाचा नवा फेक नॅरेटिव्ह पुढे आणण्याचा काँग्रेस व शरद पवार गटाचा कट आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला.

पुढे बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, मात्र, सनातन धर्म ही भारताच्या प्राचीन सहिष्णु समाजव्यवस्थेची परंपरा आहे व महात्मा गांधींनीही या परंपरेचे पालन करून सनातन धर्माचे आचरण केले होते, याचा काँग्रेसच्या लांगूलचालनवादी राजकारणास विसर पडला आहे, असे ते म्हणाले.

केशव उपाध्ये पुढे बोलताना म्हणाले की, सनातन ही देशाची संस्कृती आहे, आणि या संस्कृतीने भारताच्या समाजव्यवस्थेला सहिष्णुतेचे संस्कार दिले आहेत, १२ ऑक्टोबर २०२१ रोजी यंग इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या महात्मा गांधींच्या लेखाचा पुरावाच पत्रकारासंमोर सादर केला. मी स्वतःस सनातनी हिंदू मानतो व वेद, उपनिषदे, पुराण आणि संपूर्ण हिंदू शास्त्रांवर माझा दृढ विश्वास आहे, असे गांधीजींनी या लेखात नमूद केल्याची आठवणही यावेळी करून दिली.

शेवटी बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, ऊठसूठ हिंदुत्वाचा बेगडी मुखवटा जनतेसमोर दाखवून हिंदुत्वाचा अभिमान असल्याचा दावा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आता आव्हाड यांच्यासमोरही गुडघे टेकले असून काँग्रेसी संस्कृतीस शरण गेलेले ठाकरे आता मूग गिळून गप्प का, आव्हाडांची सनातन संस्कृतीवरील टीका त्यांना मान्य आहे का, असा सवालही केला.

रोहित पवार यांची झुंडशाही लोकशाहीसाठी अत्यंत घातक

तसेच रोहित पवार यांच्याबाबत बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, कोणतेही पुरावे न देता एका घटनेसंदर्भात पोलिसांवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरत शरद पवार गटाच्या आ. रोहित पवार यांनी पोलीस आयुक्तालयात झुंडशाही करत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार यांची ही झुंडशाही लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ही झुंडशाही मान्य आहे का, असा सवाल उपस्थित केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *