अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच : ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प ३ ते २५ मार्च या कालावधीत होणार अधिवेशन

मराठी ई-बातम्या टीम

राज्य विधिमंडळाचे २८ फेब्रुवारी २०२२ पासून नागपूरात होणारे अर्थसंकल्पिय अधिवेशन आता ३ मार्चपासून सुरु होणार असून अधिवेशनाची सांगता २५ मार्चला होणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्चला सादर करण्याचा निर्णय आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

पावसाळी अधिवेशनाची सांगता होताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी अर्थसंकल्पिय अधिवेश नागपूरात घेण्याचा विचार असल्याचे जाहीर केले. परंतु जागेच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे आणि नागपूरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन उपस्थित) उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, विधान परिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

सन २०२२-२३ या वर्षाचा अर्थ संकल्प ११ मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधकारक आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, सध्या राज्यात भाजपा विरूध्द महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू झाल्याने त्याचे पडसाद अर्थसंकल्पिय अधिवेशनात पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. यावेळी पहिल्यांदाच महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून भाजपाला या अधिवेशनात टार्गेट केले जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे दरवेळी विरोधकांकडून राज्य सरकारला लक्ष्य करण्याची प्रथा पहिल्यांदाच मोडली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आहे.

About Editor

Check Also

सांगलीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या ‌संगीता पाटील यांची निवड पाटील यांना ३४ मते; महाविकास आघाडीला मिळाली संख्याबळापेक्षा अधिकची ४ मते

‘क्या बडा ? तो दम बडा’ ‘आपलं नाव ऐकलं नाही असं याक मी गाव नाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *