Breaking News

मल्लिकार्जून खर्गे यांचा टोला, बुलडोझर संस्कृती भाजपाची, काँग्रेसची नाही

नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे, संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले व सरकारे पाडली. खऱ्या राजकीय पक्षाचे चिन्ह भाजपाला पाठिंबा देण्याऱ्या पक्षाला दिले, हे सर्व नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावरच झाले आहे. नरेंद्र मोदींनी सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा केली. लोकांना भडकावण्याचे काम केले आहे, असा पंतप्रधान देशात आजपर्यंत झाला नाही, असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी करत बुलडोझर संस्कृती भाजपाची ती काँग्रेसची नसल्याची उपरोधिक टीकाही भाजपावर केली.

हॅाटेल ग्रॅंड हयात येथे काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे आदी नेते इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

मल्लिकार्जून खर्गे पुढे बोलताना म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त खोटं बोलण्यात सराईत असून ते कितीवेळा आतापर्यंत खोटं बोलले याची माहिती मी देण्यापेक्षा आपणा सर्वांनी आतापर्यंत अनुभवले आहेत. त्याचे वेगळे पुरावे पुन्हा मी देण्याची गरज नाही. देशातील जनता भाजपाच्या कारनाम्यांवर, तोडफोड नीतीवर नाराज आहे. भाजपाच्या तोडफोड नितीविरोधात व अत्याचारी कारभाराविरोघात इंडिया आघाडी लढत आहे. देशातील वातावरण इंडिया आघाडीसाठी अनुकूल आहे. इंडिया आघाडीला महाराष्ट्रात ४८ पैकी ४६ जागा मिळतील व देशात सरकार स्थापन करु असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने ५ न्याय २५ गॅरंटी दिल्या आहेत. ३० लाख सरकारी नोकऱ्या, महालक्ष्मी योजने अंतर्गत गरिब महिलांना दरवर्षी १ लाख रुपये, २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा, शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी हटवणार, कर्जमाफी देणार, जीएसटी बदलून नवीन सरळ जीएसटी आणणार ज्याचा एकच दर असणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने लोकांना सांगत आहेत की, ८० कोटी गरिब नागरिकांना मोफत ५ किलो अन्नधान्य देणार म्हणून परंतु गरिबांना कायद्याने धान्य मिळावे यासाठी युपीए सरकारच्या काळात फूड सिक्युरिटी कायदा आणण्यात आला आहे. आता आमचे सरकार आल्यानंतर ५ किलोऐवजी १० किलो धान्य मोफत देणार असल्याचेही यावेळी सांगितले.

एका प्रश्नाला उत्तर देताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आली तर अयोध्यातील राम मंदिरावर बुलडोझर चालवणार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदीकडून करण्यात येत आहे. मात्र तो आरोप जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बुलडोझर संस्कृती भाजपाची आहे काँग्रेसची नाही आणि काँग्रेस असे काहीही करणार नाही, असेही सांगितले.

यावेळी काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी इंडिया आघाडीला या लोकसभा निवडणूकीत किती जागा मिळतील असे विचारले असता मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, आम्ही म्हत नाही की महाराष्ट्रात भाजपा प्रणित एनडीएला एकही जागा मिळणार नाही. त्यांनाही काही जागा मिळतील. पण इंडिया आघाडीला ४० ते ४६ जागा मिळतील असा कल असल्याचे दिसून आल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १० किलो मोफत धान्य देण्याची योजना ही नरेंद्र मोदींच्या योजनेवरून घेतली आहे यात तथ्य नाही. डॉ. मनमोहनसिंह सरकारने अन्न सुरक्षा कायदा आणला व त्या अंतर्गत ही योजना आहे. भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असून गहू उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. युपीए सरकारनेच ही योजना आणली होती असे सांगितले.

एका प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, निवडणुकीत सावरकर हा मुद्दा नाही, त्यावर राहुल गांधी कशाला काय बोलतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी विनाकारण चिथावणी देण्याचे काम करत आहेत अशी टीकाही यावेळी केली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *