मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही, आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगातच अँप्रेन्टीसशिप प्रतिवर्षी एक लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या जिल्ह्यातच स्थानिक उद्योगात शिकाऊ उमेदवारी अर्थात अँप्रेन्टीसशिप द्यावी, असे आदेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना आता त्यांच्या जिल्ह्यातल्या उद्योगात विद्यावेतनासह काम करण्याची संधी मिळणार आहे.

केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली औद्योगिक आस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा विनियोग करून कुशल कारागिरास आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यासाठी, राज्यात ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना’ राबवण्यात येत आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात प्रतिवर्षी तब्बल एक लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार  ३० व त्यापेक्षा जास्त  मनुष्यबळ (कंत्राटी कर्मचाऱ्यांसह) असलेल्या आस्थापनांमध्ये एकूण मनुष्यबळाच्या किमान २.५ टक्के ते कमाल २५ टक्के शिकाऊ उमेदवारीच्या जागा स्थित करणे बंधनकारक आहे. सदर योजना २७ गटातील २५८  निर्देशित (Designated), ३५ क्षेत्रातील ४१४ वैकल्पिक (Optional)  तंत्रज्ञ (व्यवसायिक) अंतर्गत सहा गटातील २० आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळाच्या १२३ व्यवसायांना शिकाऊ उमेदवारी  लागू करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवारीचा कालावधी व्यवसायनिहाय सहा ते ३६ महिने आहे.  शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षित (trained) तसेच अप्रशिक्षित (Fresher) उमेदवारांना प्रशिक्षण दिले जात आहे.

शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवून प्रोत्साहित करण्यासाठी ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना’ राज्यात मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या सुधारित अभ्यासक्रमांचाही वेळोवेळी आढावा घेऊन त्या ट्रेड्स या योजनेत समाविष्ट केल्या जातील. राज्य आणि केंद्र शासनाच्या नियमानुसार मूलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना आवश्यक ती प्रतिपूर्ती केली जाणार आहे. दरम्यान राहत्या जिल्ह्यातच स्थानिक उद्योगात शिकाऊ उमेदवारी अर्थात अँप्रेन्टीसशिप मिळत असल्याने आयटीआयच्या हजारो विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या २०० विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपसाठी नियुक्ती दिली जात होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून या नियुक्त्या दिल्या जात नव्हत्या. आता महानगरपालिकेत पूर्वीप्रमाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामधील विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपसाठी नियुक्ती देण्याबाबत मंत्री लोढा प्रयत्नशील असून यासंदर्भात त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्रही दिले आहे. लवकरच मुंबई महापालिकेसोबत इतर महापालिकांमध्येही विद्यार्थ्यांना अँप्रेन्टीसशिपची संधी मिळणार आहे.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *