मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी अनेक मराठा आंदोलकांनी मंत्रालयाच्या समोरील चौकात एकत्र येत सरकारच्या विरोधात आंदोलन केले. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. त्यानंतर मागील तीन दिवसात मंत्रालयासमोरील आणि मंत्र्यांच्या बंगल्यांना आणि पक्षाच्या कार्यालयांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली. तर आज मंत्रालयाच्या तीन्ही- चारी गेटच्या मराठा आंदोलक जमत मंत्रालय पाहण्याची मागणी करत होते. या मराठा आंदोलकांना रोखण्यासाठी मंत्रालयाभोवती पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आणि पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आली.
मंत्र्यांच्या बंगल्यांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसटी) आणि इतर रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांना अडचणी येत आहेत. याशिवाय, दक्षिण मुंबईत मरीन ड्राइव्ह ते इतर बागांपर्यंत इतर ठिकाणी मराठ्यांचा मेळावा सुरू आहे. दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या नागरिकांना वाहतुकीची मोठी समस्या भेडसावत आहे, अनेक रस्ते बंद आहेत.
आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू झाले आहे, परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा परिणाम आझाद मैदानापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मंत्रालय परिसरात झाल्याचे आज दिसून येत होते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मंत्रालयाभोवती शांतता पसरली होती. मंत्रालयाजवळून जाणाऱ्या नागरिकांना ओळखपत्र मागितले जात आहे. चहा आणि नाश्त्याची दुकानेही बंद करण्यात आली होती. दिवसरात्र गजबजलेल्या परिसरात मोजकेच लोक दिसत होते. मंत्रालयाच्या आजूबाजूच्या परिसरात फक्त सुरक्षा कर्मचारीच दिसत होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा परिणाम सामान्य नागरिकांसह राज्य सरकार चालवणाऱ्या मंत्र्यांवरही झाला आहे. आंदोलकांच्या संतापामुळे मंत्रालयाजवळील मंत्र्यांच्या बंगल्यांचे दरवाजे बंद करण्यात आले. मंत्री असो वा नसो, नेहमीच गजबजलेल्या बंगल्याला कोणताही नागरिक भेट देत नव्हता. बंगल्यांवर पोलिस तैनात करण्यात आले आहेत आणि बंगल्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचा सामान्य नागरिक, नेते तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर परिणाम झाला आहे. आंदोलकांना पक्ष कार्यालयात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पक्ष कार्यालये बंद करण्यात आली आहेत. सत्ताधारी पक्ष शिवसेनेचे बाळासाहेब भवन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ए-४ रायगड येथील कार्यालय बंद करण्यात आले आहे. तर मुख्य सत्ताधारी पक्ष भाजपचे कार्यालय उघडे आहे. सरकारमध्ये असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यालयांमध्ये नेहमीच अधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी असायची, परंतु मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळे कामगार आणि अधिकाऱ्यांची तर दूरच, त्या कार्यालयात एकही कर्मचारी नव्हता.
मंत्रालयाभोवती आणि मंत्र्यांच्या बंगल्यांच्या भोवती सुरक्षा वाढवण्यात आली आणि बॅरिकेड्स लावण्यात आले. मंत्रालयासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावण्यात आल्याचे दिसून आले. वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली. मंत्रालयापासून १०० मीटर अंतरावर बेस्ट डेपो आहे जो बंद करण्यात आला आहे आणि डेपोमधून बस सेवा बंद करण्यात आली.
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये पोलिसांसह इतर एजन्सींचे जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय दंगल नियंत्रण पथकाचाही समावेश आहे. यामध्ये पुरुष तसेच महिला सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
Marathi e-Batmya