राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघातील उमेदवारांसाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीचे मतदान आज पार पडले. अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधात काही प्रमाणात नाराजी व्यक्त करत सर्वच आर्थिकस्तरातील मतदारांनी आपला मतदानाचे कर्तव्य बजावले. मात्र या निवडणूकीसाठी झालेल्या मतदानानंतर राज्यातील कोणत्या आघाडीला किती एकूण जागा मिळणार याबाबतचे तर्क वितर्क राजकिय पक्षांसह राजकिय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रक्येक राजकिय पक्षाची कामगिरी त्या राजकिय पक्षाकडे मतदारांचा असलेला कल पाहता आणि राज्यातील कोणत्या पक्षाला कोणत्या भागातून जास्त प्रतिसाद मिळू शकतो याचा बांधणे तसे पाह्यला गेले तर सोपेही आहे आणि अवघडही आहे. मात्र आपण सर्वजण महाराष्ट्रातील सहा महसुली विभागातील लोकांचा कल आणि राजकिय पक्षांकडून केंद्रीत करण्यात आलेली राजकीय व्युवरचनेनुसार विधानसभा निवडणूकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील या विषयी एक अंदाज मराठी ई-बातम्या.कॉम या संकेतस्थळाकडून पहिल्यांदाच व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक पाहता काही महिन्यांपूर्वी देशासह महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूकी दरम्यानही असाच अंदाज आमच्या मराठी ई-बातम्या.कॉमने वर्तविला होता. परंतु तो आम्ही प्रसिद्ध न करता त्या अंदाजानुसार भाजपा बहुमताच्या जवळपास पोहोचणार नाही या आमच्या संकेतस्थळापुरता मर्यादीत ठेवण्यात आलेल्या अंदाज मात्र खरा ठरला.
विधानसभा निवडणूकीसाठीच्या मतदानानंतर अनेक नामवंत कंपन्यांकडून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीला साधारणतः किती जागा मिळणार याबाबतचे अंदाज वर्तविण्यात जवळपास वर्तविण्यात आले आहेत. एखाद दुसरा अपवाद वगळता अनेकांनी महायुतीच्या पारड्यात सत्तेचे झुकते माप टाकत एकाद दुसरा अपवाद वगळता महाविकास आघाडीच्या बाजूने अंदाज व्यक्त केला आहे.
मराठी ई-बातम्या.कॉम संकेतस्थळाने वेळोवेळी विभागनिहाय घेतलेल्या आढाव्यानुसार आणि महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या निवडणूक टेड्रिंगचाही विचार करण्यात आला आहे.
पहिल्यांदा निवडणूक ट्रेडिंगचा आणि फॉलोअपचा आपण विचार करू
साधारणतः मागील २५ वर्षाचा विचार केला तर लोकसभा निवडणूकीनंतरच राज्यात विधानसभा निवडणूका होत आले आहेत. त्यामुळे आपल्याकडे केंद्रात ज्या पक्षाची सत्ता असते त्याच पक्षाचे सरकार राज्यात स्थानापन्न झाल्याचे राज्यातील जनतेने अनेकवेळा पाहिले. फक्त अपवाद १९९९ चा, त्यावेळी राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री नारायण राणे हे होते. तर केंद्रात पंतप्रधान अटलबिहारी वाटपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार होते. वायपेयी सरकारच्या फिलगुड इंडिया आणि इंडिया शायनिगच्या नाऱ्याला भुलून महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूका केंद्र सरकारबरोबर घेण्यात आल्या. त्यानंतर शिवसेना-भाजपा युती पुन्हा यायला २०१४ साल उजाडावे लागले. त्यानंतर पुन्हा तशी परिस्थिती २०१४ ला आलेली आहे.
केंद्रात भलेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आले. परंतु बहुमतापासून लांब असल्याने या सरकारला १० वर्षानंतर राजकिय पाठिब्याच्या कुबड्याची गरज पहिल्यांदाच घ्यावी लागली. मात्र राज्यात २०००च्या निवडणूकीत राज्यात वेगळे वातावरण होते. तसेच आताही वेगळे वातावरण आहे. त्यामुळे केंद्रातील अर्थात दिल्लीतील राजकिय निकालानुसार महाराष्ट्रातही वातावरण वेगळेच आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत भाजपाला जसे बहुमतापासून लांब रहावे लागले. तसेच महाराष्ट्रातही भाजपा पुरस्कृत महायुतीला बहुमतापासून लांबच रहावे लागणार आहे.
आता विभागनिहाय निवडणूकीचे सूत्र पाहु या
महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून आपपाल्या बालेकिल्ल्यावर एकप्रकारे लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून आले. आधी आपण महायुतीच्या रणनीतीकडे पाहु, भाजपाचे प्रमुख नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या रणनीतीकडे पाहु, मागील १० वर्षात मराठवाडा आणि विदर्भात भाजपाला चांगले मिळाले. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीतही काहीशी अशीच परिस्थिती होती. मात्र भाजपाने विदर्भ राखण्यासाठी मोठा आटापिठा केला. परंतु भट्टी काही केल्या जमली नाही. त्यामुळे हा गड राखण्यासाठी पुन्हा एकदा भाजपाने विदर्भ आणि मराठवाड्यावर लक्ष केंद्रीय केले. त्यामुळे मोदी-शाह यांच्या प्रचारसभा सुरवातीला या भागातच आयोजित करण्यात आल्या.
मुंबई आणि कोकणात विभागात कोणाची सरशी
मुंबई आणि कोकणात राजकारणातील बदलते बारकावे म्हणण्यापेक्षा सत्तेतील राजकारणाची भाषा आणि भौतिक पातळीवर होत असलेले बदल याच्याकडे येथील जनतेचे नेहमी लक्ष असते. त्यामुळे या दोन्ही भागात जरी भाजपा आणि शिंदे यांची शिवसेनेचे लक्ष केंद्रीय केलेले असले तरी कोकण वगळता मुंबईत भाजपा-शिंदे शिवसेनेला फार चांगले असे काही यश मिळेल अशी शक्यता कमी आहे. मागील वेळी भाजपाला १६ जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी ती संख्या भाजपा-शिंदे शिवसेना गाठू शकेल याबाबत साशंकता आहे.
पश्चिम महाराष्ट्र अजित पवार की, शरद पवार
पश्चिम महाराष्ट्र हा तसा साखर कारखान्यांचा आणि सहकाराचा भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागात नेहमी साखर सम्राट आणि शैक्षणिक संस्था चालकांचे प्राबल्य आणि त्यांच्या भोवती फिरणारे राजकारण, शेतकरी, पतसंस्था या सगळ्याच्या माध्यमातून एकमेकाला जोडले जाणारे दुवे पाहता एकमेकाला पुरकच भूमिका घेतली जाते. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेणारे शरद पवार यांचा प्रभाव या भागावर मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच त्यांचे बेरजेचे राजकारण पाहता या भागातील स्थानिक जनतेने आतापर्यंत साथही दिली.
त्यामुळेच शरद पवार यांच्या जवळपास प्रत्येक सभेत राज्यात परिवर्तन घडवायचाय किंवा या सरकारला घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी घोषणेचे स्थानिक जनतेने नेहमीच स्वागत केले आहे. मात्र याच्या नेमकी उलट परिस्थिती अजित पवार यांची आहे. कोणे एकेकाळी काकामुळे आपल्याला विचारलं जात असे वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांनी पहिल्यांदाज भाजपाच्या मदतीने स्वतंत्र जात आहेत. अजित पवार यांच्यामुळे वैतागून ज्यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेतली ते सर्वजण पुन्हा शरद पवार यांच्याजवळ आले. त्यामुळे शरद पवार यांच्या ताकदीत पुन्हा वाढ झाली. अजित पवार यांच्या नाही. त्यातच अजित पवार यांना राज्याच्या राजकारणात एकटे पाडण्याच्या भाजपाच्या प्रयत्नाला आता त्यांचेच काका शरद पवार यांनी भरपूर खतपाणी घातले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला १० ते १५ जागांवर रोखण्याचे नियोजन भाजपासह शरद पवार यांचेही आहे. त्यातच अजित पवार पुन्हा एकदा विधानसभेत दिसतील का अशी साशंकताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अजित पवार यांना पश्चिम महाराष्ट्रात सध्यातरी स्थान मिळणे अवघड दिसत आहे.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि महाविकास आघाडी-महायुती
मराठवाड्यातून मागील वेळी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला लॉटरीमध्ये मिळालेल्या शिवसेनेला मात्र या निवडणूकीत शिवसेना उबाठाशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. त्यामुळे या पट्ट्यात खरी लढत भाजपा नाही तर दोन शिवसेनेत होणार आहे. त्यामुळे शिंदे यांच्या विद्यमान खासदारांमुळे या भागातील परिस्थिती अनुकूल वाटत असली तरी शिवसेना उबाठा लोकसभेचे उट्टे काढण्यात यशस्वी होणार बोलले जात आहे. उत्तर महाराष्ट्रातही काहीशी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे महायुतीला विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे झुंजावे लागणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सर्वाधिक सभा या मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातच झाल्या आहेत. तर मध्यंतरीचा काही अपवाद वगळता उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा नेहमीच काँग्रेससाठी अनुकूल राहिला आहे. त्यामुळे यावेळी काँग्रेसच्या धुरिणांनी बाकीच्या विभागांवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी सर्वाधिक लक्ष्य हे विदर्भावर, मराठवाड्यावर उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यावर लक्ष्य केंद्रीय केले आहे. त्यामुळे या भागातून कमी झालेल्या मतदारसंघातील जनाधार पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न आहे. तो सध्या तरी अनुकूल असल्याचे दिसून येत आहे. तसेच या भागात खरी लढत भाजपा आणि काँग्रेस यांच्यातच होत आहे. त्यामध्ये सध्या काँग्रेसची बाजू भक्कम झाल्याचे दिसून येत आहे.
Marathi e-Batmya