राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने आज डी गँगशी असलेल्या संबध आणि मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपावरून आज दुपारी अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता ईडी आणि नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी तब्बल दोन तासापेक्षा अधिक काळ युक्तीवाद केला. त्यानंतर दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नवाब मलिक यांना ३ मार्च अर्थात आठ दिवसांची ईडी कोठडी सुणावली.
ईडीकडून मलिक यांना १४ दिवसांची ईडी कोठडी देण्याची मागणी केली होती. तसेच डी गँगशी संबधित अनेक मालमत्ता खरेदीत त्यांचा संबध असल्याचा आरोप करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याची बहिण हसिना पारकर हिच्याशी आर्थिक संबध असल्याचा आरोपही ईडीकडून युक्तीवाद करताना करण्यात आला. त्यानंतर हसिना पारकर हीचा ड्रायव्हर सलिम पटेल याच्या मार्फत कुर्ला येथील जमिनीची खरेदी केल्याचा आरोप करत यात १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीचा सहभाग असल्याचा दावाही ईडीकडून न्यायालयात करण्यात आला.
यावेळी ईडीने केलेले आरोप नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न करताना म्हणाले की, नवाब मलिक यांनी कोणताही मनी लॉण्डरींगचा गुन्हा केलेला नाही. तसेच सदर जमीन खरेदी केली त्यावेळी मनी लाँडरींगचा कायदा अस्तिवात नव्हता. तसेच या जमिन खरेदी व्यवहारात २० वर्षाहूनचा कालावधी झालेला असताना इतक्या वर्षात कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित करत जुने व्यवहार उकरून काढत जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आता न्यायालया माझ्या अशिलाला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकेल असा उपरोधिक सवाल केला.
तसेच नवाब मलिक हे विद्यमान राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत असून त्यांना कोठडीत ठेवून चौकशी करण्याऐवजी बाहेर ठेवूनही त्यांची चौकशी करता येणे शक्य आहे. जर ईडीला एखाद्या कागदपत्राची मागणी केली तर ते ती कागदपत्रे उपलब्ध करून देवू शकतील असा दावाही त्यांनी केला.
जवळपास दोन ते अडीच तास दोन्हीबाजूंनी युक्तीवाद केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे लक्षात घेत अर्धातासाने आपला निकाल जारी केला. या जारी केलेल्या निकालानुसार मलिक यांना ३ मार्च पर्यंत अर्थात आठवडाभराची ईडी कोठडी सुनावली. तसेच कोठडीत असताना घरचे जेवण देण्यास आणि त्यांना असलेल्या आजारामुळे त्यांना औषधे घेण्यासही परवानगी न्यायालयाने दिली.
Marathi e-Batmya