मंगलप्रभात लोढा यांची माहिती, ७५ हजार युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खास प्रशिक्षणाच्या संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७५ वा वाढदिवस असून हा दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी कौशल्य विभाग रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा साजरा करत आहे. या अनुषंगाने राज्यातल्या सुमारे ७५ हजार युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. येत्या १७ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवडा सुरु राहणार असून १ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे.

मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक उद्योगांच्या मागणीनुसार प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबवत आहे. तर लोढा यांच्या मार्गदर्शनात राज्यातील आयटीआयमध्ये रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही आता अत्याधुनिक अल्पकालीन अभ्यासक्रम सुरु होत आहेत. कौशल्य विकासाद्वारे युवक व युवतींचे सक्षमीकरण हा यामागचा मूळ उद्देश आहे. मात्र अनेकांना नियमित कार्यशाळेत जाऊन वेळेअभावी किंवा इतर कारणास्तव प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत नाही, अशा होतकरू युवकांना आणि युवतींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात अल्पकालीन अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आयटीआयच्या नियमित वर्गाच्या व्यतिरिक्त इतर उपलब्ध वेळेत हे अभ्यासक्रम घेण्यात येतील.

पुढे बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील आयटीआयमध्ये सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबतच अतिशय अल्पदरात युवक आणि युवतींना रोबोटिक, सौर ऊर्जा तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय, व्यक्तिमत्व आणि सामाजिक विकासासंदर्भात अत्याधुनिक अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत. स्थानिक उद्योग आस्थापनांमध्ये रोजगारासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि प्रशिक्षण त्याच जिल्ह्यात मिळाल्याने तरुणांना आपला जिल्हा सोडून अन्य ठिकाणी रोजगारासाठी जावे लागणार नाही.

शेवटी बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, उद्योगांना पूरक स्वयंरोजगाराच्या संधी या अल्पकालीन अभ्याक्रमाच्या माध्यमाने तरुणांना उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे सध्या आयटीआयचे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींकडून या अभ्यासक्रमांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात सुरु होत असलेल्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती तसेच प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. अल्पकालीन अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर युवकांना रोजगाराच्या संधीबाबत आणि स्वयंरोजगाराची माहितीही संबंधित आयटीआय संस्थेत दिली जाणार आहे. उपलब्ध जागांचा विचार करता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असून युवक आणि युवतींनी त्वरित या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करावी, असे आवाहनही केले.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *