सुशिलकुमार शिंदेंच्या त्या वक्तव्यावरून नाना पटोले यांचे भाजपावर टीकास्त्र

सोलापूर शहरातील एका शासकिय कार्यक्रमानिमित्त उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांची भेट घेत भाजपा प्रवेशाचे आमंत्रण दिल्याची चर्चा आज दुपारपासून सुरु झाली. या सगळ्या घडामोडींवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीकास्त्र सोडत भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून राज्यातून व केंद्रातूनही सत्तेच्या बाहेर जाण्याची वेळ आली आहे अशी खोचक टीकाही केली.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, १० वर्षात केवळ घोषणाबाजी, जाहिरात बाजी आणि खोटेपणा करून सत्ता चालवली. जनतेला आता भाजपाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे दिसले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ४० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील असे भाजपाच्याच सर्वेत दिसून आल्याने दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने देऊन भाजपात खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे, अशी टीकाही केली.

भाजपाचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, त्यांना पराभव दिसू लागला आहे, महाराष्ट्रातून निवडून कसे यायचे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. भाजपाकडे विचारसरणी राहिलेली नाही, काहीही करून सत्ता मिळवणे व सत्तेतून जनतेच्या घामाचे पैसे कसे लुटायचे एवढीच त्यांची विचारधारा राहिली आहे, देश विकून देश चालवला जात आहे. काँग्रेसचे लोकनेते भाजपात कसे येतील यासाठी ते प्रयत्न करत असतात. ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीच त्यांना भाजपाने ऑफर दिली होती असे जाहिरपणे सांगितले आणि ते काँग्रेस सोडून जाणार नाहीत हेही स्पष्ट केले आहे. भाजपाला सत्तेचा मोह किती झाला आहे याचे दर्शन यातून होते. भाजपाकडे नेते नाहीत व उमेदवारही नाहीत, त्यांच्या पक्षात काँग्रेस व इतर पक्षातीलच अनेक नेते आहेत. भाजपाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेसुद्धा युवक काँग्रेसमध्ये होते असा गौप्यस्फोटही केला.

माजी खासदार मिलिंद देवरांबद्दल प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, देवरा कुटुंब ५० वर्षापेक्षा जास्त काळ काँग्रेसमध्ये होते, विविध पदे भूषवली, खासदार झाले, मंत्री झाले त्यावेळी त्यांना काँग्रेस नकारात्मक आहे असे वाटले नाही, आत्ताच कसे वाटू लागले. देवरा म्हणतात विकासासाठी शिंदेसेनेत गेलो पण त्यांचा व्यक्तिगत विकास थांबला होता म्हणून ते गेले आहेत. काँग्रेस पक्ष व काँग्रेसचे नेतृत्व सकारात्मकच आहे, काँग्रेससाठी देश प्रथम आहे.

मुंबईचे ग्लॅमरही गुजरातने पळवले..

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा यावेळी गुजरातमध्ये होत आहे, यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले तेव्हा तेव्हा ते महाराष्ट्रातून काही ना काही गुजरातला घेऊन गेले. ते देशाचे पंतप्रधान आहेत का गुजरातचे? याआधी महाराष्ट्रातील वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, मुंबईतील हिरे उद्योग गुजरातला घेऊन गेले. काल परवा आले आणि मुंबईतील ग्लॅमर असलेला फिल्म फेअर सोहळाही गुजरातला घेऊन गेले. महाराष्ट्र लुटला जात आहे आणि राज्यातील हस्तक गुजरात लॉबी सांगेल त्याप्रमाणे वागत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी खोचक टीकाही केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *