Breaking News

नाना पटोले म्हणाले, उद्धव ठाकरेंशी… संपर्क होऊ शकला नाही NEET परिक्षाच रद्द करा, परिक्षेतील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा

विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा विचार आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. अर्ज मागे घेण्यास अजून वेळ असून लवकरच यावर निर्णय होईल, अशी आशा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कोकण, मुंबई व नाशिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर व नाशिकच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली होती. परंतु शिवसेनेने परस्पर कोकण, नाशिक व मुंबई मतदार संघासाठीचे उमेदवार जाहीर केले. विधान परिषद निवडणुकीचा निर्णय एकत्र बसून केल्यास महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे चांगले यश मिळू शकेल यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांना संपर्क केला तेव्हा ते परदेशात होते. आज मातोश्रीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. अजुनही वेळ गेलेली नाही, चर्चेतून मार्ग निघू शकतो अशी आशाही व्यक्त केली.

नीट परिक्षाच रद्द करा..

नीट परिक्षेत घोटाळा झालेला असून डॉक्टर बनण्याचे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. या परिक्षेचे सर्व नियंत्रण केंद्र सरकारकडे असते, ही परीक्षाच भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे. आपला मुलगा डॉक्टर व्हावा यासाठी पालक लाखो रुपये खर्च करतात. पण या भ्रष्टाचारामुळे पालक व विद्यार्थ्यांची घोर निराशा होत आहे. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांनी डॉक्टर होऊ नये हे भाजपाचे षडयंत्र आहे. नीट परीक्षा जुन्याच पद्धतीने घेतली पाहिजे अशी मागणी करत नीट परिक्षेत झालेल्या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींना शिक्षा केली पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.

भाजपाला आता आरएसएसची गरज नाही..

सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारला दिलेल्या सल्ल्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोहन भागवत यांनी भाजपा सरकारला काहीही सल्ला दिला तरी ते सरकार मानेल असे वाटत नाही, असा उपरोधिक टोला नाना पटोले यांनी लगावला.

Check Also

रोहित पवार यांचे छगन भुजबळ यांना आव्हान, आरोप सिद्ध करून दाखवा… प्रचंड दहशतीत असलेल्यांना धीर देणे चूकीचे काय

मागील सहा महिन्याहून अधिक काळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *