Breaking News

नाना पटोले यांचा इशारा, शेतक-यांच्या अडचणीत नॅाट रिचेबल असणा-या सरकारला… गावोगावी शेतक-यांनी सरकारच्या गलथानपणाचा पाढा वाचला

संपूर्ण राज्य दुष्काळात होरपळत असून माता भगिणींना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. शेतक-यांनी पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेल्या फळबागा वाळून गेल्या आहेत. जनावरांना चारा पाणी नाही. पशुधन जगवताना शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. दुष्काळी परिस्थितीचा सामना करत जगण्याचा संघर्ष करणा-या शेतक-याला वा-यावर सोडून सरकार सुट्टीवर गेले आहे. मुख्यमंत्री मूळगावी आराम करत आहेत तर कृषीमंत्री विदेश दौ-यावर आहेत. आता जनता यांना सत्तेवरून खाली खेचून सुट्टी देईल असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज मराठवाडा दौ-यावर आहेत. आज त्यांनी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकरी बांधवांशी संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार कल्याण काळे, आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार नामदेव पवार, किरण पाटील डोणगावकर, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी मंञी अनिल पटेल, विनोद तांबे, रविंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, जायकवाडीसारखे मोठे धरण असूनही पैठण तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे हे सरकारच्या गलथानपणाचे निदर्शक आहे. मोदींची हर घर नल योजना फक्त त्यांच्या भाषणात आहे. प्रत्यक्षात ती कुठेही अस्तित्वात नाही. या अडचणीच्या काळात केंद्र किंवा राज्य सरकारने शेतक-यांना मदत केली नाही. पीक कर्ज माफ करणे तर दूरच ऊलट बॅंका कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहेत. शेतक-यांकडून विम्याचा हप्ता भरून घेतला मात्र नुकसान भरपाई काही मिळाली नाही. सत्तेत बसलेल्या लोकांना मात्र जनतेचे काही देणेघेणे राहिले नाही. निधी आणि टक्केवारीच्या पलिकडे सत्ताधा-यांना कशाचेच काही देणेघेणे राहिले नाही. शेतक-यांनी खचून जाऊ नये काँग्रेस पक्ष आगामी विधानसभेत सरकारला जाब विचारून शेतक-यांना न्याय मिळवून देईल असे आश्वस्त करून शेतक-यांनी टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहनही केले.

संभाजीनगर नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बीडच्या गेवराई तालुक्यातील रुई येथील रेशीम उत्पादक शेतक-यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतक-यांच्या समस्यांची जाणिव करून देण्यासाठी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री दोघांनाही फोन लावला दोघांचेही फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शेतकरी एवढ्या भयानक संकटात असताना सरकार मात्र सुट्टीची मजा घेत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला यावेळी उपस्थित शेतक-यांनीही सरकारच्या आणि प्रशासनाच्या अनास्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर नाना पटोले यांनी जालना जिल्ह्यातील अंबड आणि बदनापूर तालुक्यातील विविध गावातील शेतात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. या परिसरातील मोसंबी उत्पादक शेतक-यांना मोठा फटका बसला असून वर्षानुवर्षे पोटच्या लेकरांप्रमाणे जगवलेल्या बागा काढून टाकण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. पण सरकार मात्र ढिम्मच आहे. या भागातील शेतक-यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई असून जनावरांसाठी चारा छावण्या सुरु नाहीत असे शेतक-यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्व शेतक-यांच्या अडचणी जाणून घेत आगामी अधिवेशनात दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरून मदत करण्यास भाग पाडू असे आश्वासन दिले.

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांना नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली व शेतकरी बांधवांशी संवाद साधला तर प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांनी कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील गावांमधील शेतावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

Check Also

नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य,… लढाई अजून संपलेली नाही काँग्रेसच्या ५ न्याय व २५ गॅरंटी घरोघरी पोहचवण्यात सेल व विभागाचे मोठे योगदान

काँग्रेस पक्ष हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत सर्व समाज घटकाला …

One comment

  1. Daily Update

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *